अध्याय एकोणतिसावा
उद्धव भगवंताना म्हणाला, साधकाने जी जी साधने करावीत ती ती तुमच्या कृपेने सुफल संपूर्ण होतात. अत्यंत निष्ठेने साधना करणाऱ्या कित्येक थोर थोर साधकांचा तुम्ही उद्धार केलेला आहेत. मात्र साध्या भोळ्dया लोकांना योगाभ्यास, तप, व्रतवैकल्ये इत्यदि कष्टसाध्य गोष्टी जमण्यासारख्या नाहीत. अशा लोकांचाही उद्धार व्हावा ह्यादृष्टीने, आता माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्यांना सहज आचरणात आणता येईल असा काही उपाय सांगा. असे म्हणून उद्धवाने देवांच्या पायावर डोके ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला, देवा मी तुम्हाला आत्ताच ही विनंती करण्याचे कारण म्हणजे तुम्ही आता लवकरच निजधामाला जाण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे. तुम्ही निजधामाला गेल्यावर दीन जनांचा उद्धार व्हावा म्हणून सहज समजून अमलात येण्याजोगा उपाय आम्हाला कोण सांगणार? तुमच्या एव्हढा दीनजनांचा कैवारी मला तरी कोण आढळत नाही. दीनजनांचा उद्धार व्हावा म्हणून उद्धवाने केलेली कळकळीची विनंती ऐकून कृपामूर्ती भगवंत संतुष्ट झाले. उद्धवावर प्रसन्न होऊन संसार तरुन जाण्यासाठी ब्रह्मप्राप्ती होण्याचा सहज सोपा उपाय आता भगवंत सुहास्यवदनाने सांगणार आहेत. भगवंत मेघगर्जनेप्रमाणे गडगडाटी आवाजात बोलू लागले. ते म्हणाले, उद्धवा तू धन्य आहेस. तुझा प्रश्न ऐकून मला अत्यंत समाधान
वाटले.
भोळ्dयाभाबड्या सर्वसामान्य लोकांचाही उद्धार होण्यासाठी त्यांनी माझी भक्ती करावी. त्यामुळे मी त्यांना वश होऊन सदैव त्यांचाच होऊन राहतो. जो माझे भजन करतो त्याच्या मी आधीन होऊन राहतो. माझे भजन करणारे मला सर्व सारखेच प्रिय असतात. त्यात जात, गोत, ज्ञानी, अज्ञानी असा कोणताही फरक मी करत नाही. कशाप्रकारे माझे भजन करावे म्हणजे मी संतुष्ट होतो तेही सांगतो. माझे भजन करणे म्हणजे भागवदधर्माचे आचरण करणे होय. असे भजन केले की, पूर्वी केलेल्या दुष्कर्मामुळे झालेले नुकसान भरून येते आणि संपूर्ण चित्तशुद्धी साध्य होते. माझ्या भजनामुळे कर्माकर्माचे निरसन होते आणि जन्ममरणाचे दुष्टचक्र संपुष्टात येते. या भगवदधर्माचे आचरण केले की, भवाची म्हणजे संसाराची सर्व व्यथा समूळ उन्मळून जाते. त्या धर्माच्या आचरणामुळे साधकाला आपोआपच सुखसंपन्नता येते. या धर्माचे स्तवन केल्याने असत्य बोलण्याचे सगळे दोष नाहीसे होतात. या धर्माबाबत जे कोण काही सांगेल ते आदराने ऐकले असता विषयातून आलेल्या दोषांचे निर्दालन होते.
भागवदधर्म अतिसुमंगल असून तो सर्व दोषांचे दहन करतो. माझ्या भजनामुळे मंगलाचेही परम मंगल होते. अत्यंत श्रद्धेने मी सांगत असलेल्या भागवदधर्माचे आचरण केले की माझ्या स्वरूपाबद्दल प्रेम उत्पन्न होते. त्यामुळे समोर दिसणारी दुनिया खरी आहे असा झालेला भ्रम नाहीसा होऊन जन्ममरणांचा फेरा चुकतो.
उद्धवा, हा जन्ममरणाचा फेरा चुकवणे भल्याभल्यांना शक्य होत नाही. ब्रह्मदेव एव्हढा श्रेष्ठ पण मृत्यू त्याचाही घास घेतो. एव्हढेच काय हरिहरांनाही मृत्यू मारून टाकतो. मृत्यूवर विजय मिळवणे हे अतिशय कठीण असते.
असा हा दुर्जय मृत्यू सुरासुरांच्या हृदयात धडकी भरवून त्यांना थरथर कापायला लावतो. असे जरी असले तरी भक्तिभावाने माझे भजन करणारे भक्त मृत्यूची खतावणी फाडून टाकण्यास सक्षम होतात. मृत्यूचे भय संपल्यामुळे ते आनंदाने संसार करत असतात. माझ्याशी एकरूप होऊन माझे भजन करणारे भक्त कलीकाळाचे दात पडून त्याच्याच घशात घालायला मागेपुढे पहात नाहीत. भगवंताच्या भजनाचा महिमा उद्धव जाणून होता, तरीपण त्या भजनाची एव्हढी थोरवी असून ते करणारे भक्त कलिकाळालासुद्धा भारी पडतात हे ऐकून उद्धव चकितच झाला. तो भगवंताना म्हणाला तुमच्या भजनाचे महात्म्य ऐकून मी संतुष्ट झालो आहे. आता कृपया हे भजन कसे करायचे तेही सविस्तर सांगा अशी माझी विनंती आहे.
क्रमश?








