स्वामीजी गंगाधरेंद्र महास्वामी : भगवद्गीता अभियानाचा शुभारंभ : तालुका-विभागांमध्ये भगवद्गीता पठणचा संकल्प
बेळगाव : भगवद्गीता हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे. चित्त आणि स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी योगासोबतच भगवद्गीता पठणाचा मार्ग सांगितला जातो. व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकता, सामाजिक सामरस्य, राष्ट्रीय भावना या चार खांबांवर समाज आधारलेला आहे. देशात भाषा, प्रांत वेगळे असले तरी सर्वश्रेष्ठ भगवद्गीताच आहे. जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीत जगण्याचा मार्ग शिकवणारी भगवद्गीता प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठीच भगवद्गीता अभियान राबविले जात असल्याचे विचार गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामी यांनी व्यक्त केले. भगवद्गीता अभियानाचा मंगळवारी बेळगावमध्ये शुभारंभ करण्यात आला. संत मीरा शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी स्वामीजी बोलत होते. व्यासपीठावर निडसोशी येथील डॉ. निजलिंगेश्वर महास्वामीजी, आर्ष विद्या केंद्राचे चित्प्रकाशानंदजी, राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उद्योजक गोपाळ जिनगौडा, अरविंद देशपांडे, विश्वेश्वर हेगडे यासह इतर उपस्थित होते. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, आम्ही सर्व भारतीय आहोत. आपल्या देशाची संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ समजली जाते. भगवद्गीता हा सर्वोच्च धर्मग्रंथ असून यामधून संस्कारी पिढी घडविली जाते. भगवद्गीतेच्या पठणाने उज्ज्वल भविष्य निर्माण करणारे विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. प्रत्येकामध्ये बदल घडविण्यासाठी भगवद्गीता महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने प्रत्येकाने भगवद्गीतेचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांनी स्वागत व परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींचा सत्कार करण्यात आला. सुब्रम्हण्यम भट्ट यांनी आभार मानले. यावेळी भगवद्गीतेतील दहाव्या अध्यायाचे पठण करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व विभागांमध्ये भगवद्गीतेचे पठण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.









