विजेचा होतोय अपव्यय : स्थानिकांमधून संताप
बेळगाव : भडकल गल्ली, कचेरी गल्ली, खडक गल्ली या परिसरात मागील चार दिवसांपासून दिवसरात्र पथदीप सुरू आहेत. महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांना कळवूनही त्यांच्याकडून सोमवारपर्यंत पथदीप बंद करण्यात आले नव्हते. यामुळे विजेचा अपव्यय होत असून नागरिकांच्या खिशातूनच ते बिल वसूल होणार आहे. त्यामुळे स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे कोळशाचा तुटवडा असल्याने ग्रामीण भागात तासन्तास भारनियमन केले जात असताना शहरात मात्र विजेचा अपव्यय केला जात आहे. शहराच्या अधिकतर भागात पथदीप सुरू अथवा बंद अशीच परिस्थिती असल्याने नागरिक हैराण आहेत. मध्यंतरी शहरातील संपूर्ण पथदीप एकाचवेळी सुरू व बंद होतील अशी व्यवस्था करण्यासाठी महानगरपालिका व हेस्कॉमने पुढाकार घेतला होता. परंतु त्यानंतर मात्र हा प्रस्ताव रखडला. सध्या प्रत्येक विभागात कर्मचाऱयांकडून पथदीप सुरू व बंद केले जातात. परंतु त्यांच्या निष्काळजीपणामुळे दिवसाही पथदीप सुरू राहतात. यामुळे विजेचा अपव्यय होत असून असे प्रकार थांबवावेत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.









