20 जण सक्रीय, 726 जणांची तपासणी, लोकांनीच घ्यावी काळजी
प्रतिनिधी /पणजी
राज्यात सण, उत्सव व नववर्षाची जय्यत तयारी असतानाच कोविड संकटाने पुन्हा एकदा डोकेवर काढल्याने सर्वांनीच काळजी घेण्याची गरज बनली आहे. दिवसेंदिवस कोविडबाधितांचा आकडा वाढत असल्याने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. लोकांनी जर स्वतःहून नियमांचे पालन न केल्यास भविष्यात पुन्हा एकदा मोठय़ा संकटाला तोंड द्यावे लागणार आहे, अशी भीती बांबोळी इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या चोवीस तासांत करण्यात आलेल्या तपासणीत एकजण कोविडबाधित रुग्ण आढळला असून, कोविडच्या सक्रीय रुग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. दिवसभरात 726 जणांचे नमुने तपासले. राज्यात देशी व विदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल होत असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे, असे सरकारने आवाहन केले आहे.
भारतात आज दिवसभरात 243 नवीन कोविड प्रकरणे नोंदली गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 3,609 झाली आहे. दैनंदिन सकारात्मकता दर 0.11 टक्के नोंदवला गेला तर साप्ताहिक सकारात्मकता 0.16 टक्के इतकी नोंदवली गेल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) चीनमधील संसर्गाच्या नवीनतम वाढीचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता आहे, असे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी ट्वीटरवरून सांगितले. बीजिंगने त्याच्या लोकसंख्येवरील नियमित पीसीआर चाचणीसह शून्य-COVID धोरणे रद्द केल्यानंतर या महिन्यात संपूर्ण चीनमध्ये कोविड संक्रमण वाढले आहे, त्याचा परिणाम भारतातही होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.









