काल-परवा ज्या पद्धतीने चिल्लर समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघासमोर पाकिस्तान नतमस्तक झाले ते पाहून 2007 मधील भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना आठवला. एका लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या संघाकडून पराभव पत्करल्यानंतर नेमकी काय शिक्षा मिळते, हे फक्त भारतीय संघच सांगू शकतो. कदाचित अफगाण विरुद्ध पाकिस्तान हा सामना इतिहासाची री‘ ओढू शकतो. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखायला लावली. त्यानंतर अफगाणी संघाने गतविश्वविजेत्या इंग्लंड आणि त्यानंतर काल परवा पाकिस्तानला हरवलं. या तिन्ही संघाना पराभवाची चव ही कारल्याच्या चवीपेक्षाही कडवट वाटली असावी. युद्धाच्या पार्श्वभूमीवर होरपळलेला अफगाणिस्तान संघ त्यातच स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तानमध्ये झालेले भूकंप. त्यावरून आपण अंदाज बांधू शकाल की ते कुठल्या मानसिकतेतून भारतात आले असावेत.
फार पूर्वी ज्यावेळी सौरव गांगुली एक चोरटी धाव घ्यायचा त्यावेळी मनामध्ये प्रचंड भीती वाटायची. जोपर्यंत सौरव गांगुली एक चोरटी धाव पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत आपण गांगुलीवर विश्वास ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे या मोठ्या स्पर्धेत लिंबू टिंबू संघ तगड्या संघांना कधी रस्त्यावर आणतील हे सांगता येत नाही. 1983 मध्ये कच्चा समजला जाणारा झिंबाब्वे संघ धोकादायक ठरु पाहत होता. पाच बाद 17 आठवते ना भारताची ती केविलवाणी परिस्थिती. (परंतु त्यानंतर कपिलने इतिहास घडवला नसता तर) जसं राजकारणात कोणालाही गृहीत धरून चालणं हे धोकादायक असतं तसेच विश्वचषक स्पर्धेच्या मोठ्या मंचावर चिल्लर समजल्या जाणाऱ्या संघाला कुठल्या तगड्या संघाने गृहीत धरता कामा नये. ह्या चिल्लर संघाचे तत्वच असं असतं की ‘बनी तो बनी नही तो रामागडी धनी’. हे जे लिंबूटिंबू संघ असतात ना तेच मुळात बीपीएल कार्ड घेऊनच स्पर्धेत प्रवेश करतात. कधी तळ्यातून मळ्यात प्रवेश करतील आणि भरलेल्या उसाचा खात्मा करतील हे सांगता येत नाही. क्वालिफाय फेरीतून येणारे संघ हे काठावर पास होणारे संघ असतात. एखाद्या दहावीतील विद्यार्थ्याला काठावर पास होणे म्हणजे त्याला लागलेला एक प्रकारचा जॅकपॉट असतो. असंच काहीसा जॅकपॉट हा पात्रता फेरीत पास झालेल्या संघांसाठी असतो.
त्यांचे एकच उद्दिष्ट असते ते म्हणजे समोरच्याला गाफिल ठेवत समोरच्या संघाचा भ्रमाचा भोपळा फोडायचा. ज्यावेळी अफगाणिस्तानसारखे संघ तगड्या संघाला हरवतात आणि ज्यावेळेस त्यांचे उपांत्य फेरीचे दरवाजे बंद होण्याची वेळ येते त्यानंतर होणारी जी जखम असते ती कमीत कमी चार वर्षे भरून येत नाही. आणि भरलीच तरी त्यावरील व्रण मात्र कायम राहतात. कधी कधी मोठे संघ लिंबू टिंबू संघाला तुच्छ लेखतात. एका पराभवाने आपले काय बिघडते असाच त्यांचा अॅटीट्यूड असतो. मान्य आहे की कधीकधी बलवान समजल्या जाणाऱ्या संघांचा त्यादिवशी त्या खेळपट्टीवर त्यांचा दिवस नसतो. म्हणून जर तुम्ही छोट्या छोट्या चुका करत राहिलात तर त्या चुकीला माफी नाही. ही बाब अफगाणिस्तानने एकदा नव्हे तर दोनदा दाखवून दिली आहे. एखादा अपक्ष उमेदवार ज्यावेळी लोकसभेत किंवा विधानसभेत मान्यताप्राप्त पक्षातील उमेदवाराचा पराभव करतो त्यावेळी मान्यताप्राप्त पक्षातील उमेदवाराची जी केविलवाणी परिस्थिती झालेली असते तशीच काहीशी परिस्थिती सध्या इंग्लंड आणि पाकिस्तानची या विश्वचषक स्पर्धेत झालेली आहे. दे धक्का, हे तंत्र फार पूर्वीपासून विश्वचषक स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहे. अर्थात ही स्पर्धा त्याला कशी अपवाद राहील? बघूया अजून अफगाणिस्तान कुणाचं कंबरडं मोडतंय. शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तगड्या संघाने छोट्या संघाला कमी लेखू नये. विशेषत: विश्वचषक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत तर नाहीच नाही, अन्यथा बलवान समजल्या जाणाऱ्या सर्व संघाचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही, हे या स्पर्धेने दाखवून दिले आहे एवढं मात्र खरं.
विजय बागायतकर, क्रिकेट समालोचक









