ग्वाल्हेरच्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींचे आवाहन
► वृत्तसंस्था / ग्वाल्हेर
मध्यप्रदेशातील जनतेने विकास विरोधी शक्तींपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार विकास करण्यासाठी झटत आहे. मध्यप्रदेशला भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील जनता या प्रयत्नांमध्ये आमच्यासह राहील असा आम्हाला विश्वास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते येथील जाहीर सभेत सोमवारी भाषण करीत होते.
ग्वाल्हेर ही स्वातंत्र्यसैनिकांची आणि योद्ध्यांची भूमी आहे. ही क्रांतिकारकांची भूमी आहे. राजमाता विजयाराजे शिंदे, कुशाभाऊ ठाकरे आणि दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे नेते याच भूमीने घडविले आहेत. या भूमीत जन्मलेल्या वीरांनी देशासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली आहे. अशी ही भूमी सातत्याने देशभक्तांच्याच पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बिमारु राज्यापासून मुक्ती
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मध्यप्रदेश या राज्याला बिमारु राज्य म्हणून ओळखले जाण्यापासून सोडविले आहे. खरा विकास याच पक्षाच्या कार्यकाळात झाला असून आज हे राज्य देशात विकासाच्या संदर्भात पहिल्या 10 राज्यांमध्ये समाविष्ट झाले आहे. त्याला पहिल्या 3 राज्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्ही योजना आखल्या आहेत. आमच्यावर जनतेचा विश्वास असून या विधानसभा निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा आशावाद त्यांनी प्रगट केला.
विरोधकांजवळ विचार नाही
विरोधकांजवळ राज्याच्या भवितव्याची दृष्टी नाही. ते जातीपातीच्या राजकारणात गुंतले आहेत. देशाचा आणि राज्याचा आर्थिक विकास झाल्याखेरीज कोणत्याही समाजघटकाचा विकास होणेही शक्य नसते. आमच्या सरकारने राज्यात अनेक नवे विकास प्रकल्प आणले असून ते पूर्ण करण्यासाठी लोक पाठिंबा देतील, याची शाश्वती आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
19,000 कोटी रुपयांच्या योजना
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर भागाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांची घोषणा केली. त्यांच्यावर आगामी काळात 19,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यांपैकी काही प्रकल्पांची कोनशीला स्थापन करण्याचा कार्यक्रम झालेला असून या प्रकल्पांवर कामाचा प्रारंभही झाला आहे.









