मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी नागरिकांना लसीकरण करण्याचे तसेच खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याने सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, तसेच बुस्टर डोससाठी पात्र असलेल्या सर्वांनी प्राधान्याने ते घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांनी बुस्टर डोस घ्यावा व स्वतः लसीकरण करून घ्यावे, असे डॉ. मुख्यमंत्री म्हणाले. तथापि, राज्यात मास्क सक्तीबद्दल मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी बोलताना द्वितीय डोस घेतल्या नंतर नऊ महिने पूर्ण झालेल्यांपैकी बरेच जण बुस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 54 हजार जणांनीच हा डोस घेतला आहे.
दरम्यान, मोफत बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या 1.8 लाख लोकांमध्ये खास करून आरोग्य कर्मचारी, प्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील लोकांचा समावेश आहे. त्यासाठी आज दि. 5 जून रोजी राज्यात ‘टिका उत्सव’ आयोजित करण्यात आला असून राज्यातील विविध केंद्रांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.