पंतप्रधान मोदी यांचा वारंगळमध्ये सभेत इशारा
वृत्तसंस्था/वारंगळ
काँग्रेस आणि बीआरएस हे दोन्ही पक्ष जनतेची दिशाभूल करीत असल्याने त्यांच्यापासून मतदारांनीं सावध रहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे एका जाहीर सभेत केले आहे. या सभेच्या सोबतच त्यांनी तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.
जे राजकीय पक्ष घराणेशाहीच्या आधारावर राजकारण करतात, ते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. घराण्याची सत्ता आणि वर्चस्व टिकविण्यासाठी त्यांना भ्रष्टाचार करण्याची आवश्यकता भासते. ते विकासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. काँग्रेस पक्ष कशा प्रकारे भ्रष्टाचारात बुडालेला आहे, हे साऱ्या भारताने पाहिले आणि अनुभवले आहे. तेलंगणात सध्या सत्तेवर असलेल्या भारत राष्ट्र समिती किंवा बीआरएस या पक्षाची स्थितीही तशीच आहे. तेलंगणातील लोक आता या घराणेशाहीच्या सत्तांना कंटाळले असून त्यांना परिवर्तन हवे आहे. जेव्हा आपण तेलंगणात येतो तेव्हा घराणेशाहीमुळे या राज्याची कशी दुर्दशा झाली आहे, हेच दिसून येते. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर आणा, असे आवाहन त्यांनी केले.
लोकांच्या बलिदानातून राज्याची निर्मिती
तेलंगणा राज्याची निर्मिती येथींल लोकांच्या बलिदानातून झालेली आहे. तथापि, आतापर्यंत येथे जे पक्ष सत्तेवर राहिलेले आहेत, त्यांनी लोकांच्या अपेक्षाभंग केला असून केवळ स्वत:चे हित आणि कुटुंबाची सुरक्षा पाहिली आहे. येथील सत्ताधारी पक्ष आणि सरकार यांच्यात भ्रष्टाचारासंबंधी एकवाक्यता आहे ही दुर्दैवाची बाब आहे. लोकांना आता लवकरच परिस्थितीत परिवर्तन घडविण्याची संधी मिळेल. ती त्यांनी आवश्य साधावी आणि हे जोखड दूर करावे, असे आवाहन त्यांनी केले.









