महाराष्ट्रात विविध भागात धार्मिक स्थळांचे पावित्र्यभंग, मूर्तींची विटंबना, पोस्टरचे नुकसान, पुतळ्dयांना रंग फासणे, रात्रीत मोकळ्या जागी पुतळा उभारणे, मिरवणुकीत वाद अशा घटना घडत आहेत. त्यातूनच अकोल्यात एकाचा मृत्यू, शेवगावमध्ये जाळपोळ झाली. त्र्यंबकेश्वरला वातावरण तापले. महाराष्ट्र दंगलीच्या उंबरठ्यावर आहे. उंबरठा ओलांडण्यापूर्वी तरुणांनी एकदा पुनर्विचार करायला हवा.
2009 नंतर महाराष्ट्रातील जातीय किंवा धार्मिक दंगलींचे प्रमाण घटत चाललेले होते. 2009 मध्ये झालेल्या मिरज दंगलीनंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. यावेळी झालेल्या दंग्यांमध्ये तरुणांच्या एका पिढीचे आणि निष्पापांचे अक्षरश: नुकसान झाले. दंगलीस कारणीभूत सर्व बाजूचे राजकीय नेते निर्दोष मुक्त झाले. त्यांना मिळायचे ते लाभ मिळूनही गेले. मात्र दंगल पाहण्यासाठी, घोषणा, गर्दीचा भाग होण्यासाठी आणि भरकटलेल्या माथ्याने हिंसाचारासाठी जो तरुण वर्ग अनाहूतपणे यात ओढला गेला होता, त्यानी चौदा वर्षे वनवासच भोगला. अनेकांना सरकारी नोकऱ्या खुणावत होत्या. मात्र दंगलीत आरोपी, खटला प्रलंबित असल्याने नोकरीसाठी अर्ज करता आला नाही.
तेरा वर्षे खटल्यात गेली. या दरम्यान वय उलटून गेले आणि आता खटल्यातून पुराव्याअभावी मुक्ततेनंतर सुद्धा आयुष्यभराची शिक्षा मिळाली! अनेकांचे विवाह झाले नाहीत. झालेल्यांच्या आयुष्यात कटकटी निर्माण झाल्या. जगण्यासाठी पडेल ती कामे करून दंगलीच्या त्या एका क्षणाला आठवत आसवे ढाळण्याची वेळ आली.
दंगल झाल्यानंतर जेलमध्ये आपण जातीसाठी, धर्मासाठी काहीतरी करून आलो आहोत अशी त्यांची भावना होती. मात्र त्यांना जामीन देऊन सोडवायलाही कोणी आले नाहीत. दीड, दोन महिने कारागृहात काढल्यानंतर घरच्यांनीच खटपटी करून जामीन मिळवला. बाहेर आल्यानंतर ना त्यांच्या मदतीला कोणी होते, ना खटला चालवण्यासाठी! आठ दहा युवकांनी एकत्र येऊन एक वकील द्यायचा आणि तारखेला हजर राहायचे. एकेका खटल्यात शंभर, सव्वाशे आरोपी असल्याने सगळे उपस्थित नाहीत या कारणाने न्यायाधीश पुढची तारीख द्यायचे. तेरा वर्षे खासगी रोजगारावर रजा घेऊन दिलेल्या तारखांना हजर राहणे आणि प्रत्येक तारखेवेळी वकिलाच्या हातात 200-500 ची नोट ठेवत हेलपाटे सुरु राहिले. त्यांचे सुदैव हेच म्हणायचे की, शांतता प्रस्थापित करण्यातच वैतागलेल्या पोलिसांनी खटले दाखल करताना सर्वांना सर्व ठिकाणच्या गुह्यात आरोपी केले! एकच व्यक्ती एकाच वेळी अनेक ठिकाणच्या गुह्यात कशी सहभागी असू शकते? या एकाच शंकेने आणि तेवढ्याच युक्तीवादाने 14 वर्षे सुरु असणारा आरोपी संबोधण्याचा अपमान, कोर्टातील मानहानी, प्रत्येक सणावेळी नोटीसीची अवहेलना मान खाली घालून सोसणे थांबले. पण, हीच एक मोठी शिक्षा ठरली. आयुष्याचे वाटोळे हा या शिक्षेचा भोग!
हे इतके सविस्तरपणे लिहिण्याचे कारण हेच की, गेल्या महिन्याभरातील घटनांची कल्पना असतानाही त्यांचा उल्लेख टाळून 14 वर्षानंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती उद्भवते की काय? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा दंगली घडतात की काय आणि त्यात अशाच पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील तरुण होरपळले जाणार काय? अशी शंका वाटावी इतके गंभीर वातावरण आहे.
महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावात मंदिर आणि मशिदीचे पावित्र्यभंग करणाऱ्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी मिरवणुकांमध्ये आव्हानात्मक गाणी आणि नृत्ये तर त्याला प्रत्युत्तर म्हणून दगडफेक होत आहे. 2020मध्ये कोरोना काळात जनता कर्फ्युसाठी 144 कलम लागू असतानासुद्धा जळगावच्या रावेरमध्ये दंगल झाली होती. दिल्ली आणि त्रिपुरातील दंग्यांचे पडसाद अमरावती, नांदेड, मालेगाव, यवतमाळचे पुसद, वाशिमचे करंजा येथे उमटले. अलीकडेच छ. संभाजीनगर, मुंबईत मालवणी येथे दंगे झाले. अकोला, शेवगावच्या घटना ताज्या आहेत त्याला फोडणी मारण्यासाठी त्र्यंबकेश्वरचे प्रकरण वापरले जात आहे. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या कपोलकल्पित धर्मांध कथांनी, मॉर्फ केलेल्या व्हिडिओनी आणि आता असेच होणार, जागे व्हा! अशा तळटीपांनी प्रत्येकाचा मोबाईल आणि मस्तक व्यापायला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना याप्रकरणी स्वत: सक्रीय व्हावे अशी अपेक्षा वर्तवली असली तरी ती अपेक्षाच बनून राहिली आहे. काही ठिकाणी दंगलीवेळी पोलीस अधिकारीच गायब असल्याचे आरोप होत आहेत. हे सगळेच भयंकर आहे. या सगळ्यांमागे असणाऱ्या समाजकंटकांची समाजाला जाणीव नाही अशातला भाग नाही.
दोन्ही बाजूने राजकीय लाभ उठवणाऱ्या व्यक्ती आणि संस्था इतकेच नव्हे तर राजकीय पक्षही कार्यरत आहेत. मात्र या विरोधात ज्यांनी सक्रियता दाखवायची ते मूग गिळून गप्प आहेत. परिणामी धार्मिक उन्माद वाढवणाऱ्यांना आता द्वेष वाढवून आपल्या मागे बहकलेल्या तरुणांची गर्दी वाढवायची आहे. त्यांचा शस्त्रासारखा वापर करायचा आणि त्यांच्याकडून काही कृती घडल्यानंतर रिकामटेकड्यांकडे मजकूर फिरवण्याची जबाबदारी सोपवायची. आपण आपल्या धर्मासाठी हे करतोय अशी त्यांची भावना असते.
कायद्याच्या भाषेत ते समाजकंटक ठरतात याची जाणीव नसावी. या सगळ्या परिस्थितीला ज्यांना सामोरे जायचे आहे त्या युवा वर्गाने आणि मजकूर फिरवणाऱ्या ज्येष्ठ वर्गाने याचा एकदा साकल्याने विचार करावा आणि समाजाचे राहू द्या, किमान स्वत: समाजकंटक होण्यापासून वाचावे ही आजची गरज बनली आहे.
शिवराज काटकर








