धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण नाहीच : इमारतींची नोंद ठेवण्याबाबत महापालिका उदासीन
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील धोकादायक इमारतींची नोंद महापालिका प्रशासनाकडे नाही. धोकादायक इमारती रहिवाशांसह अन्य नागरिकांना जीवघेण्या ठरत आहेत. धोकादायक इमारतींचा शोध घेऊन वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहर आणि उपनगरात जीर्ण झालेल्या असंख्य इमारती असून खबरदारीच्या उपाययोजना मनपा प्रशासन राबविणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिका व्याप्तीमध्ये असंख्य जुन्या इमारती आहेत. सदर इमारती पावसाळय़ात कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. मात्र अशा धोकादायक इमारतींबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. अनेकवेळा धोकादायक इमारती कोसळून नागरिकांचे नुकसान झाले आहे. पण याचे गांभीर्य महापालिका प्रशासनाला नाही. अशा इमारतींची नोंद ठेवण्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन आहे. अनेकवेळा धोकादायक इमारती हटविण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. पण महापालिका याबाबत कोणतीच कारवाई करीत नाही. यामुळे इमारतीशेजारी राहणाऱया रहिवाशांना जीव मुठीत धरून रहावे लागते. 2019 मध्ये पावसामुळे 1200 हून अधिक घरांचे नुकसान झाले होते. मागील वषी 21 घरांची पडझड झाली होती. यंदा महिन्याभरात 16 घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. मात्र आतापर्यंत या पडझडीत जीवितहानी झाली नाही. शहरात 1 लाख 40 हजारांहून अधिक मालमत्ता आहेत. यामध्ये निम्म्यांहून अधिक घरे जुनी आहेत. त्यामुळे या घरांची स्थिती धोकादायक आहे का? याची पाहणी करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.
इमारत मालकांना नोटीस बजाविण्याची आवश्यकता
महापालिका प्रशासनाला याबाबत कोणतेच सोयरसुतक नसल्याचे निदर्शनास आले आहे. जीर्ण झालेले जुने घर कोसळण्याच्या मार्गावर असल्यास त्यामुळे अन्य लोकांना याचा धोका होऊ नये, याची दखल घेऊन इमारत मालकांना ही इमारत हटविण्यासाठी नोटीस बजाविण्याची कारवाई महापालिकेने करण्याची आवश्यकता आहे. अशा धोकादायक इमारती हटविण्याबाबत नागरिक आणि महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांनी जागृत होणे गरजेचे आहे. धोकादायक इमारती हटविल्यास पावसाळय़ात घडणारे अनर्थ टळण्याची शक्मयता आहे.
कॅम्प येथे एका घरात दोन महिला राहत होत्या. जोरदार पावसामुळे सदर इमारत कोसळली. या घटनेत प्राणहानी झाली नाही मात्र खानापूर तालुक्मयात चुंचवाड येथे घराची भिंत कोसळल्याने एका मुलाचा बळी गेला आहे. अशा गंभीर घटना घडून जीवितहानी होत आहे. शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी धोकादायक इमारती असून त्यामध्ये नागरिक वास्तव्य करीत आहेत. धोकादायक घरांचे सर्वेक्षण करून महापालिकेने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
नोंद ठेवल्यास उपाय-योजना राबविणे शक्य
धोकादायक इमारतींची माहिती महापालिकेकडून घेतली जात नाही. दरवषी पावसाळय़ात जीर्ण इमारतींच्या भिंती कोसळणे किंवा इमारत कोसळण्याच्या घटना घडतात. काही वेळा अशा घरांमध्ये राहणारे नागरिक जखमी होतात. तसेच जीर्ण झालेली घरे कोसळल्यामुळे जीवनावश्यक साहित्याचे नुकसान होते. नुकसानभरपाईसाठी शासनाकडे धाव घ्यावी लागते. पण शासनाकडून म्हणावी तितकी नुकसानभरपाई दिली जात नाही. नुकसानभरपाईसाठी वर्षांनुवर्षे सरकारी कार्यालयांच्या पायऱया झिजवाव्या लागतात. महापालिका प्रशासनाने जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याची नोंद ठेवल्यास पावसाळय़ात आवश्यक उपाय-योजना राबविण्यात येवू शकतात.