घरफोड्यांच्या घटनात वाढ : परगावी जाताना काळजी घेण्याचे आवाहन : पोलीस पथकांकडून गुन्हेगारांचा शोध सुरू
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात बंद घरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. बंद घरांचे कडीकोयंडे तोडून व पाठीमागील दरवाजा फोडून किमती ऐवज लांबविण्याचा सपाटाच गुन्हेगारांनी लावला असून गेल्या आठवडाभरात सहाहून अधिक चोऱ्या, घरफोड्या घडल्या आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे परगावी जाताना खबरदारी घ्या, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे. बेळगाव परिसरात सध्या सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या स्थानिक आहेत की परप्रांतीय आहेत? याची चौकशी सुरू आहे. पोलीस दलाने खास करून उपनगरात गस्त वाढविली असून नागरिकांनीही आपली मालमत्ता व दागदागिन्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे.
मंगळवारी माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील रुक्मिणीनगर व रामतीर्थनगर परिसरात दोन घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले आहे. रुक्मिणीनगर येथील महाबुबी पठाण या 21 मे रोजी दुपारी 3 वाजता आपल्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. मंगळवार दि. 23 मे रोजी सकाळी 9 वाजता त्या घरी परतल्या. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी महाबुबी यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा फोडून त्यांच्या घरातील सुमारे 40 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. दुसरी घटना रामतीर्थनगर परिसरात घडली आहे. शोभा महारुद्राप्पा पुजार या शनिवार दि. 13 मे रोजी दुपारी आपल्या घराला कुलूप लावून परगावी गेल्या होत्या. मंगळवार दि. 23 मे रोजी सायंकाळी 5 वाजता त्या घरी परतल्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागचा दरवाजा फोडून घरातील किमती ऐवज पळविल्याचे उघडकीस आले. 67 हजार 450 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व 25 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही चोरी प्रकरणात साम्य आहे. कारण पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे पाठीमागचा दरवाजा फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा शोध घेण्यात येत आहे. बेळगाव ग्रामीण, टिळकवाडी, माळमारुती आदी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात बंद घरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. भरदिवसा घरफोड्या सुरू आहेत. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. विधानसभा निवडणूक बंदोबस्ताच्या ताणतणातून अधिकारी आता कुठे बाहेर पडले आहेत. तोच गुन्हेगारांनी शहरात धुमाकूळ सुरू केला आहे.
नागरिकांनीही घ्यावी खबदारी!

बंद घरांना लक्ष्य बनविणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत. नागरिकांनीही परगावी जाताना काही खबरदारी घेण्याचे आवाहन गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे. एक-दोन दिवस घराला कुलूप लावून परगावी जाताना शेजाऱ्यांना किंवा जवळच्या पोलीस स्थानकात माहिती द्यावी. शक्यतो आपल्या घरातील तिजोरीत सोन्या-चांदीचे किमती दागिने ठेवू नयेत. परगावी जाण्यापूर्वी ते लॉकरमध्ये ठेवावेत. गुन्हेगारांना ठळकपणे दिसेल असे कुलूप लावू नये. सेंटर लॉकचा वापर करावा. शेजाऱ्यांना सांगून रात्रीच्या वेळी आपल्या घरासमोरील लाईट सुरू राहील, याची काळजी घ्यावी. सोशल मीडियावर आपण सहलीवर आहोत, परगावी निघालो आहोत, याची माहिती देणारे फोटो अपलोड करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पोलीस पथके गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. नागरिकांनीही याकामी पोलीस दलाला सहकार्य करावे, स्वत:ही खबरदारी घेण्याचे आवाहन पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे.









