वेर्णा पोलिसांची सामन्याच्या निकालापूर्वीच कारवाई : पाचजणांना अटक, दहा लाखांचे साहित्य जप्त
वास्को : टी 20 आशिया कप क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या बेटिंगचा व्यवहार वेर्णा पोलिसांनी सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच उधळून लावला. झुआरीनगर सांकवाळ भागात एका ठिकाणावर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकून पाच व्यक्तींसह 10 लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यात 6 लॅपटॉप तसेच 54 मोबाईल फोनसह 10 लाखांच्या ऐवजाचा समावेश आहे. झुआरीनगर भागात टाटा रियो वसाहतीजवळ टी 20 आशिया कप क्रिकेटच्या भारत व पाकिस्तान यांच्यामधील अंतिम सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती वेर्णा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्या अड्ड्यावर छापा टाकला आणि बेटिंग चालवणाऱ्या पाचजणांना रंगेहाथ पकडले. पाचहीजण बिगरगोमंतकीय आहेत. दीपक कारवाणी (मध्यप्रदेश), मनोजकुमार (बिहार), मदन मुखिया (बिहार), जगदीश चौधरी (महाराष्ट्र), अरविंद विश्वकर्मा (महाराष्ट्र) अशी त्यांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या धाडीत पोलिसांनी त्यांच्याकडून 54 मोबाईल फोन, 1 टीव्ही संच, सहा लॅपटॉप, 17 बँक पासबूक, 2 इन्टरनेट राऊटर्स व अन्य साहित्य मिळून 10 लाखांचा ऐवज जप्त केला. वेर्णा पोलिस अधिक तपास करीत आहेत. याच भागात यापूर्वीही बेटींगविरूध्द कारवाई झाली आहे.









