धामणे परिसरात कोळपणीच्या कामात शेतकरी मग्न : वडगाव शिवारात पाणी साचल्याने संकट
वार्ताहर /धामणे
दरवर्षी भात पेरणीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना अडचणी येतच असतात. परंतु या सर्व अडचणींवर मात करून शेतकरीवर्ग आपल्या शेतातील भात पिकाची काळजी घेत असतो. याचप्रकारे यंदा भात पेरणीच्या वेळी शेतकरीवर्गात गोंधळ उडाला होता. गेल्या महिन्याच्या मध्यंतरीच्या काळात धामणे, हलगा, बस्तवाड, जुने बेळगाव आणि शहापूर शिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात झाली होती. त्याचवेळी शहापूर शिवार, वडगाव, जुने बेळगाव येथील शेतकऱ्यांनी तातडीने भात पेरणी केली. त्यानंतर दोन वेळा या भागात वळीव पाऊस उत्तम प्रकारे पडला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पेरलेले भात चांगल्या प्रकारे उगवले. त्यामुळे येथील शेतकरी भात पिकात कोळपणी करण्याचे काम करत आहेत. परंतु धामणे, हलगा,बस्तवाड या भागातील भात पेरणी करण्यापूर्वीच पेरणीपूर्व मशागतीच्या कामाच्या वेळेला वळीस पाऊस पडल्याने भात पेरणी रेंगाळली. त्यामुळे धामणे, हलगा, बस्तवाड भागातील पेरणी केलेल्या भाताचे रोप आता बारीक दिसत आहेत. जुने बेळगाव, वडगाव शिवारातील भात पेरणी केली असली तरी चार दिवसांपूर्वी वळीव पाऊस जुने बेळगाव, वडगाव शिवारात मोठ्या प्रमाणात पडल्याने या शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पेरणी करण्यात आलेले भात पीक खराब होणार का, अशी भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.









