प्रथम बक्षिसादाखल स्मृतिचिन्हासह रोख रु. 51 हजार : कर्नाटक, तामिळनाडू, गोवा यांच्यात झाली अंतिम फेरी
फोंडा : अखिल भारतीय सृजन भजन स्पर्धेत बेतोडा येथील श्री सातेरी प्रासादिक संगीत संस्थेने संपूर्ण गोव्याला अभिमान वाटणारे यश प्राप्त करत या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मिळविले आहे. स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच अहमदनगर महाराष्ट्र येथे घेण्यात आली. स्पर्धेसाठी पथकांची निवड ऑनलाईन माध्यमातून करण्यात आली होती. अंतिम फेरीसाठी गोव्यातून सातेरी प्रासादिक संस्थेसह कर्नाटक व तामिळनाडू येथील दोन पथके पात्र ठरली होती. प्रथम बक्षीस विजेत्या गोव्याच्या श्री सातेरी प्रासादिक संगीत संस्थेला रु. 51,000 चे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
पंधरा वर्षांत भरीव कामगिरी
सातेरी प्रासादिक संस्था गेल्या पंधरा वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असून संगीत शिक्षक आनंद सालेलकर यांचे या पथकाला मार्गदर्शन लाभत आहे. सन 2013 मध्ये कला अकादमीच्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत संस्थेचा पुरुष गट अव्वल ठरला होता.
बाल पथकाने साधली हॅट्ट्रिक
याशिवाय बाल गटात कला अकादमीच्या भजनी स्पर्धेत सन 2016 ते 18 अशी सलग तीन वर्षे सातेरी प्रासादिकच्या बाल भजनी पथकाने प्रथम स्थान पटकावून हॅट्ट्रिक साधली होती. सन 2022 साली कला अकादमीच्या महिला भजन स्पर्धेतही राज्य स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. याशिवाय राज्यभरातील विविध भजनी स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके प्राप्त केली आहे. अखिल भारतीय सृजन भजन स्पर्धेतील विजेत्या पथकामध्ये गायक कलाकार श्रुती सालेलकर, हर्षदा सालेलकर, रेषा गावडे, मृणाली गावडे, दिव्यता सालेलकर, श्रद्धा गावडे तसेच हार्मोनियक वादक आनंद सालेलकर व पखवाजवादक विनय चव्हाण यांचा सहभाग होता.









