अपघात व समस्यांना बेशिस्त ट्रक पार्किंग कारणीभूत
वार्ताहर /दाभाळ
बेतोडा बोरी बगल रस्ता मालवाहू ट्रकांसाठी पार्किंगचा अड्डा बनून राहिला आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या जाणाऱ्या या अवजड वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या बेशिस्त ट्रकपार्किंगवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील वाहतुकीवरील ताण कमी व्हावा यासाठी बोरी बेतोडा बगल रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र हा रस्ता विविध राज्यातून माल घेऊन येणाऱ्या ट्रकांसाठी पार्किंगच्या अड्डा बनून राहिला आहे. येथील कण्णेव्हाळ जंक्शनवर दोन्ही बाजूनी बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या या ट्रकांमुळे बेतोडा निरंकाल मार्गावरील वाहनांना बगल रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचा वाढता धोका निर्माण झाला आहे.
फोंडा तालुक्यातील विविध औद्योगिक वसाहतीमध्ये माल घेऊन येणारे हे ट्रक बेतोडा बगल रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पार्क करून ठेवले जातात. मालवाहतुकीचा पुढील प्रवास निश्चित होईपर्यंत बऱ्याच ट्रक चालकांकडून याठिकाणी मुक्काम ठोकला जातो. बेतोडा कण्णेव्हाळ जंक्शन ते बोणबाग हा साधारण 2 किलोमीटरचा बगल रस्ता या मालवाहू ट्रकांनीच काबीज केला आहे. ट्रक चालकांना याठिकाणी स्वच्छता गृहांची सोय नसल्याने आंघोळ व नैसर्गिक विधी रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच उरकले जातात. त्यामुळे दुर्गंधी व रोगराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही लोक बगल रस्त्याच्या बाजूची जागा आपली असल्याचे सांगून या ट्रकवाल्यांकडून पार्किंगचे पैसे वसुल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. बेतोडा ग्रामसभेत बऱ्याचवेळा हा विषय चर्चेला आला आहे. बगल रस्त्याच्या शंभर मिटरच्या परिघात नो पोर्किंग झोन जाहीर करून ते फलक उभारण्याची सूचना ग्रामस्थांनी केली आहे. मात्र अद्याप तेथे एकही फलक उभारलेला दिसत नाही. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते. तरीही बेशिस्त पार्किंगचे प्रकार अद्याप थांबलेले नाही. बरेच ट्रक चालक रात्रीच्यावेळी दारू पिऊन दंगामस्ती करतात. त्यामुळे आसपासच्या परिसरात राहणाऱ्या व तेथून कामानिमित्त नियमित पायी ये-जा करणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
वाहतूक पोलिसांकडून बघ्याची भूमिका
कण्णेव्हाळ बेतोडा जंक्शनवर वाहतूक पोलीस नियमितपणे उभे राहून विना हेल्मेट व वाहतुकीचे अन्य नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावण्यासाठी थांबलेले दिसतात. मात्र त्यांना वाहतुकीला अडथळा ठरणारे हे मालवाहू ट्रक दिसत नाही. याबद्दल नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. यासंबंधी बोलताना पंचसदस्य दिनेश गावकर सांगतात, येथील बेशिस्त ट्रक पार्किंगवर कारवाई व्हावी यासाठी पंचायतीने वाहतुक पोलीस, उपजिल्हाधिकारी व अन्य संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतू सरकारची कोणतीच यंत्रणा ठोस कारवाई करीत नसल्याने ट्रक चालकांना रान मोकळे मिळाले आहे. संबंधित खात्याशी पुन्हा एकदा पाठपुरावा केला जाईल. तरीही कारवाई होत नसल्यास ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असे त्यांनी सांगितले. बेतोडा सरपंच उमेश गावडे यांनीही बगल रस्त्याच्या बाजुला ट्रक पार्किंग करण्यास आक्षेप घेतला आहे. स्थानिकांच्या या संबंधी वाढत्या तक्रारी असून पंचायत पुन्हा एकदा वाहतूक पोलीस, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व अन्य संबंधितांशी पत्रव्यवहार करणार आहे. तसेच येत्या काही दिवसात नव्याने नो पार्किंगचे फलक उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.









