वृत्तसंस्था / कटक
सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील कटक येथे रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात खेळताना इंग्लंडचा अष्टपैलु जेकब बेथेलला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो आता 19 फेब्रुवारीपासून पाकमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी माहिती इंग्लंडचा कर्णधार बटलरने दिली आहे.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील नागपूरच्या पहिल्या सामन्यात 21 वर्षीय बेथेलने अर्धशतक झळकविले होते. तसेच त्याने 1 गडी बाद केला होता. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी अंतिम संघ निवडण्याची मुदत बुधवारी संपणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील इंग्लंडच्या मोहिमेला 22 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाबरोबरच्या सामन्याने होणार आहे.









