फॅब चषक 10 वर्षाखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित धरतीजीओ फॅब चषक 10 वर्षांखालील वयोगटाच्या आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेतील विविध सामन्यांत डीओएफसीने एमएसडीएफचा, बीटाने डीयुएफसी बी चा, मॅजीक अ ने नम्म बिर्लाचा, डीयुएफसीने मॅजीक ब चा, मॅजीक अ ने मॅजीक ब चा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. तर बीटाला एमएसडीएफने गोल शून्य बरोबरीत रोखले. वडगाव येथील सीआर-7, स्पोर्ट्स एरिनाच्या फुटबॉल टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात डीयुएफसीने एमएसडीएफ ब चा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला अलीच्या पासवरती पियुषने गोल केला. दुसऱ्या सत्रात एमएसडीएफच्या झहीरने गोल करण्याची नामी संधी दवडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. साईला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्या सामन्यात बीटा संघाने डीयुएफसी ब संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला बिटाच्या रियांसने दिलेल्या पासवर अर्णवने गोल करून 1-0 ची आघाडी मिळून दिली. 23 व्या मिनिटाला बीटाच्या अर्णवच्या पासवर अहमदने दुसरा गोल करून आपल्या संघाला 2-0 ची आघाडी तर 29 व्या मिनिटाला अहमदच्या पासवर रियांसने आपल्या संघाचा तिसरा गोल केला. या सामन्यात डीयुएफसीला गोल करण्यात अपयश आले. अहमदला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तिसऱ्या सामन्यात मॅजिक अ ने नम्म बिर्लाचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात 9 व्या मिनिटाला मॅजिकच्या टॅविक्सोने दिलेल्या पासवर सात्विकने गोल केला. 20 व्या मिनिटाला नम्म बिर्लाच्या रितेशच्या पासवर अंकीतने गोल करुन आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. 25 व्या मिनिटाला मॅजिक सात्विकच्या पासवर टॅविक्सोने गोल करून आपल्या संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला. सात्विकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
चौथ्या सामन्यात डीयूएफसीने मॅजिक ब चा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. 22 व्या मिनिटाला डीयूएफसीच्या अंकीतच्या पासवर आयुरने गोल करून आपल्या संघाला निसटता विजय मिळवून दिला. आयुरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पाचव्या सामन्यात बीटाला मॅजिक ब ने गोल शून्य बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. दोन्ही संघाना गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या. पण त्यांना गोलात रूपांतर करण्यात अपयश आल्याने हा सामना बरोबरीत राहिला. विवानला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सहाव्या सामन्यात मॅजिक ब ने मॅजिक अ चा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 7 व्या मिनिटाला मॅजिक अ च्या सात्विकने गोल करण्याची नामी संधी दवडली. 13 व्या मिनिटाला मॅजिक अ च्या टॅविक्सोने मारलेला वेगवान फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. 28 व्या. मिनिटाला मॅजिक ब संघातील आरवच्या पासवर शिवमने गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.









