वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओडिशामध्ये 13 ते 29 जानेवारी दरम्यान सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट क्षेत्रातील आघाडीचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी यजमान भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
ओडिशा राज्यातील भुवनेश्वर आणि राऊरकेला या शहरांमध्ये ही स्पर्धा शुक्रवारपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचा ड गटात समावेश आहे. ड गटामध्ये इंग्लंड, वेल्स आणि स्पेन या संघांचाही सहभाग आहे. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची कामगिरी बऱयाच वर्षांनंतर दर्जेदार झाली होती. भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 41 वर्षांनंतरचा पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणताना कांस्यपदक मिळविले होते.
2023 ची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतात होणार असल्याने भारतीय हॉकी संघाला वातावरणाशी जुळवून घेताना फारसे कठीण जाणार नाही. भारतीय हॉकी संघ यावेळी निश्चितच दर्जेदार कामगिरी करून शौकिनांच्या अपेक्षा पूर्ण करेल. तथापि, भारतीय हॉकी संघाला ‘चक दे’ अशा शब्दात शुभेच्छा सचिनने दिल्या आहेत. माजी कर्णधार विराट कोहलीने भारतीय हॉकी संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण भारतीय जनतेच्या आपल्याला शुभेच्छा असून या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी आम्हा सर्वांच्या तुमच्यामागे सदैव शुभेच्छा राहतील, असेही कोहलीने आपल्या ट्विटरवर भारतीय संघाला संदेश दिला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी आपल्या ट्विटरवर भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय हॉकी संघ या स्पर्धेत निश्चित दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास लक्ष्मण यांनी व्यक्त केला आहे. भारताचे माजी हॉकीपटू रूपिंदरपाल सिंग यांनी आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताची महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज तसेच मयांक अग्रवाल व भारतीय क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा संदेश पाठविले आहेत. 2023 सालातील विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतीय हॉकी क्षेत्राला प्रोत्साहन देणारी ठरेल. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान, नेदरलँड्स, न्यूझीलंड, मलेशिया, चिली, भारत, इंग्लंड, स्पेन आणि वेल्स या संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस राहील.









