कोल्हापूर म्हंटल की तांबडा-पंधरा रस्सा आणि झणझणीत मिसळ आपल्याला आठवते. कोल्हापूरला येणारा प्रत्येक पर्यटक याची चव चाखल्याशिवाय राहत नाही. याचबरोबर कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. प्राचीन काळापासून कोल्हापूर हे दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीकाठी वसलेले कोल्हापूर हे मोठे सुंदर शहर आहे. ऐतिहासिक गड-कोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम सुफलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्व विलक्षण आहे.
ऑनलाईन टीम/तरुण भारत
दुर्ग, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्ये, हेरिटेज वास्तू, धरणे, जंगल सफारीची ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे. वस्तूत: साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच. तर शहराच्या आजूबाजूला पन्हाळा, गगनबावडा, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य इत्यादी धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांची ठिकाणे आणि आकर्षणे (Tourist places and attractions) आहेत. त्यामुळे कोल्हापूरला यायचा बेत असेल आणि धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे पाहायची असतील तर या ठिकाणांना नक्की भेट द्या…
श्री अंबाबाई मंदिर
कोल्हापुरात आलेला प्रत्येक पर्यटक अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाही. अंबाबाई मंदिर ज्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते. अंबाबाई देवीला समर्पित असलेले हे मंदिर ५२ शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी मंदिर आहे. हे एक आहे मंदिर आहे जिथे भक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी येतात. हे कोल्हापुरातील सर्वाधिक आकर्षण आणि सुंदज पर्यटन स्थळ आहे. मंदिराच्या वास्तुवरचे नक्षीकाम, बाहेरील संरचना आणि स्तंभांची कलाकृती म्हणजे अद्भुत कलेचा नमुनाच पाहायला मिळतो. देवीची मूर्ती ३ फूट उंच काळा पाषाण आणि मौल्यवान रत्नांपासून बनविलेली असून ४० किलो वजनाची आहे. अंबाबाई हिंदूंमध्ये पूजनीय देवी आहे. या मंदिराला भारतातील सर्वात महत्वाच्या तीर्थस्थळांचा दर्जा आहे. तसेच भवानी मंडप, जुना राजवाडा परिसर हे आकर्षण आहे.
जोतिबा मंदिर
कोल्हापूर शहराच्या वायव्ये दिशेस जेमतेम १५ किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग या नावाने पण देखील ओळखतात. पसरट भूभागावर एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या सोंडे सारख्या दिसणाऱ्या या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथे हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून इथे केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. जोतिबाला घातले जाणारे खेटे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. यात्रेवेळच्या उंच उंच सासनकाठ्या प्रसिद्ध. येथे बारा ज्योतिर्लिंग आहेत. जवळच यमाई मंदिर आहे.
रंकाळा तलाव, कोल्हापूर
कोल्हापुरातील रंकाळा तलावाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे स्थान असून पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. चित्रपटांचे चित्रिकरण, लेखक आणि कलाकारांसाठी हे एक सतत प्रेरणा देणारे ठिकाण आहे. तलावाच्या मध्यभागी एक रंक भैरवाचे मंदिर आहे. या तलावाला रंकळा असे नाव या मंदिरावरून देण्यात आले आहे. तलावासाठी राजघाट आणि मराठघाट असे दोन घाट आहेत. राजघाटावर रंकाळा मनोरा आणि त्याच्या समोर शालिनी पॅलेस पाहायला मिळतो. रंकाळा चौपाटीवर संध्याकाळच्या वेळी सुखद वातावरणामध्ये पर्यटक व नागरिकांची मोठी गर्दी होत असते. येथे पर्यटक नौकाविहार, घोडेस्वारी, मुले उद्यानात खेळू शकतात तसेच भूक लागल्यास येथील स्टॉलवर असलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात.
न्यू पॅलेस म्युझियम
न्यू पॅलेस म्युझियम कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापुरचे वैभव आहे. येथील छत्रपती शहाजी म्युझियम हे खास आकर्षण आहे.
छत्रपती शाहू संग्रहालय आणि छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे न्यू पॅलेस संग्रहालय कोल्हापुरातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. राजवाड्याच्या तळमजल्यावर असलेल्या संग्रहालयात कोल्हापूरच्या शाही जीवनाचा आढावा घेता येतो, ज्यात दागदागिने, वेशभूषा, नाणी, शस्त्रे, चित्रे आणि बिबट्या, सिंह, हरिण इत्यादींनी भरलेल्या वस्तूंचा समावेश आहे. फोटो गॅलरीसह, भरतकाम केलेले कमानी असलेले दरबार हॉल, कोरीव स्तंभ आणि मोठेपणा दर्शविणारा उंच सिंहास. त्याचबबरोबर राजघराण्यातील वापरातील वस्तू, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, शिकार केलेले प्राणी, दुर्मिळ पत्रव्यवहार, राजप्रासाद घड्याळाचा मनोरा हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे.
टाऊन हॉल म्युझियम
कोल्हापूर शहरात नवगॉथिक वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले टाऊन हॉल हे वस्तूसंग्रहालय आहे. या ठिकाणी सातवाहनकालिन अनेक वस्तू आहेत. ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती आहेत . बोटॅनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत.
खिद्रापूरचे कोपेश्वर
शिरोळ तालुक्यात कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे. प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे हे मंदिर आहे. कोल्हापूरपासून ६० ते ७० किमी. अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारा राशींचे बारा खांब आहेत. अत्यंत कोरीव नक्षीदार खांब, हत्ती, रामायण, महाभारतातील प्रसंग, राशिचिन्हे, प्राणी यांची कलाकुसर मंदिरावर आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून मंदिराला घोषित केला आहे.
रामलिंग-धुळोबा
कोल्हापुरपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर हातकणंगले जवळ रामलिंग, धुळोबी ही देवस्थाने आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा असून पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणपती मूर्ती आहे. देवालयाच्या बाहेरील बाजूस हेमाडपंथी शिल्प आहे. कन्नड भाषेतील शिलालेख असून थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे. याच परिसरात डोंगरमाथ्यावर अल्लमप्रभूचे देवस्थान मध्ययुगीन बांधणीचे आहे.
किल्ले पन्हाळगड
कोल्हापूरपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहारच्या वेढ्यातून विशाळगडावर सुरक्षित पोहोचण्यापूर्वी आणीबाणीप्रसंगी बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशिद यांनी पन्हाळगडावर सैन्याला थोपवून धरले. हा ऐतिहासिक किल्ले पन्हाळगळ पर्यटकांना आकर्षण आहे. कोल्हापूरची पहिली राजधानी म्हणून हा पन्हाळा ओळखला जातो. प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह यांची पन्हाळा ही राजधानी होती. किल्ल्याचे बांधकाम भोज राजाच्या कालखंडात झाले आहे. पन्हाळा किल्ला शिव छत्रपतींच्या आणि संभाजीराजांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. पुसाटी बुरुज, तबक उद्यान, नायकिनीचा सज्जा, तीन दरवाजा, धान्य कोठार, अंबरखाना, धर्मकोठी, हिरकणी बुरूज, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय या ठिकाणी आहे. काही किलोमीटरवर मसाई पठारावर बौद्धकालीन गुहा व लेणी आहेत.
विशाळगड
कोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला असून गडाच्या चारहीबाजूने मोठे खंदक आहेत. गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळनगरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. निसर्गाची उधळण असलेला पारगडा किल्ला चंदगड ते तिलारी मार्गावर आहे. चिरेबंदी पायऱ्या, डोंगरदऱ्या, हिरवीगर्द झाडी, निरव शांतता या परिसराचे वैशिष्ट्य आहे.
दाजीपूर अभयारण्य
जंगलांच्या घनदाट हिरवळीत संपूर्ण जीवनकाळातील उत्तम रोमांच आणि आठवणींचा अनुभव घेण्यासाठी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य सफारीची निवड करा. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य मुख्यत: गव्यासाठी प्रसिद्ध आहे. हरिण, सांबर, चितळ, बिबट्या, अस्वले, साळींदर, कोल्हा, निलगाय विविध जातींचे साप या ठिकाणी आढळतात. वनविभागाने या ठिकाणी तंबू निवास, भोजनाची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी भेट द्या आणि दाजीपूर वन्यजीव अभयारण्य सफारी बुकिंगसाठी पॅडल बोटिंग आणि प्रेक्षणीय स्थळांसारख्या अनेक रोमांचक कार्यात भाग घ्या. मंत्रमुग्ध करणार्या शिबीर सत्रात जा, रोमांचक जंगल सफारीचा एक भाग व्हा आणि निश्चितच वन्यजीव पाहण्याचा आनंद घ्या.
राधानगरी धरण
राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांनी १०० वर्षापूर्वी भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले. धरण पूर्ण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात. कोल्हापूरपासून ७५ किलोमीटर अंतरावर आहे. या धरणाशेजारीच काळम्मावाडी धरण असून परिसरात बाग विकसित केली आहे. जंगल भ्रमंतीसाठी येथे गर्दी होते.
थंड हवेचे ठिकाण-आंबा
शाहूवाडी तालुक्यातील आंबा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आंबा घाट, जंगल, जैव विविधता, औषधी वनस्पती, अधिक पावसाचा भाग, झरे, धबधबे, प्रसन्न वातावरण हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच ऋतुत भेट देण्यासारखे ठिकाण आहे. कोल्हापूरपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. आजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर रामतीर्थ धबधबा आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. त्यासह विविध ठिकाणी छोटी छोटी वास्तुकलेची मंदिरे आहेत. कोल्हापूरपासून ८५ किलोमीटरच्या अंतरावर आहे.
टेंबलाई मंदिर
टेंबलाई टेकडी हे कोल्हापुरातील भेटीसाठीचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या टेकडीवर “टेंबलाबाई” देवीचे मंदिर आणि आणखी एक लहान मंदिर आहे. प्रत्येक आषाढीमध्ये मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी ओतण्याचा धार्मिक सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या टेकडीवर यमाई देवीचे पण एक मंदिर आहे. देवस्थान समितीने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. टेकडीच्या मध्यभागी “गणपती” ची एक विशाल मूर्ती आहे. अभ्यागतांसाठी एक लहान बाग विकसित केली गेली आहे. दरवर्षी “श्रावण” महिन्यात “त्र्यंबोली यात्रा” म्हणून ओळखला जाणारा एक दिवसीय उत्सव होतो.
सिद्धगिरी मठ, संग्रहालय
याला कणेरी मठ म्हणून पण ओळखले जाते. कोल्हापूरच्या कणेरी येथे सिद्धगिरी ग्रामजीवन मेण संग्रहालय आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ आणि शिव मंदिरात हे संग्रहालय आहे. मेण व सिमेंट शिल्पांच्या मदतीने ग्रामीण जीवनाचे संग्रहालयात चित्रण आहे.