सातारा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, सातारा व कराड नगरपरिषद, दहिवडी नगरपंचायत, मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा उद्या सन्मान
कराड / प्रतिनिधी :
राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा नगरपरिषद, कराड नगरपरिषद दहिवडी नगरपंचायत व मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा सन्मान रविवारी 5 रोजी जागतिक पर्यावरण दिनी मुंबईत होत आहे. याबाबतचे पत्र माझी वसुंधरा अभियान संचालनालयाच्या वतीने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त झाले आहे.
राज्य शासनाने पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी निगडित पर्यावरणाच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे. या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पर्यावरणाच्या दृष्टीने कार्यक्रम राबवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. यात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी जागतिक पर्यावरणदिनी गौरवण्यात येते. गतवर्षी सातारा जिल्ह्यातील कराड नगरपरिषदेने यामध्ये राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकावला होता.
या वर्षी सातारा जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सातारा, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी, अमृत गटात सातारा नगरपरिषद, नगरपालिका गटात कराड नगरपरिषद, नगरपंचायत गटात दहिवडी तर ग्रामपंचायत गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. त्यामुळे माझी वसुंधरा अभियान संचालनालयाच्या वतीने या स्थानिक स्वराज्य संस्थांना आज पत्र प्राप्त झाले असून या पत्रात सर्वोत्तम कामगिरीबद्दल आपला सन्मान मुंबईत करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा नरिमन पॉईंटवरील टाटा थिएटरमध्ये सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. याच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे गुणानुक्रम जाहीर होणार आहेत.