वृत्तसंस्था/ मुंबई
केवळ एका पायावर फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलने कौशल्याचे जे विलक्षण प्रदर्शन घडविले आणि मंगळवारी अफगाणिस्तानवर ऑस्ट्रेलियाला तीन गडी राखून जो चित्तथरारक विजय मिळवून दिला त्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. ऑस्ट्रेलियाने विजय नोंदवताच दिग्गज सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपल्या भावना व्यक्त करताना मॅक्सवेलच्या खेळीला आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळी संबोधले. ‘झद्रानच्या 118 धावांच्या अप्रतिम खेळीने अफगाणिस्तानला चांगल्या स्थितीत आणून ठेवले होते. त्यांनी दुसऱ्या सत्रामध्ये चांगली सुऊवात करून 70 षटके ते चांगले क्रिकेट खेळले. पण मॅक्सवेल ज्या प्रकारे शेवटची 25 षटके खेळला ते त्यांचे नशीब बदलून गेले. ‘मॅक्स प्रेशर’पासून ‘मॅक्स परफॉर्मन्स’पर्यंत. मी माझ्या आयुष्यात पाहिलेली ही सर्वोत्तम एकदिवसीय खेळी आहे’, असे तेंडुलकरन आपल्या पोस्टमध्ये लिहिले.









