मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासक उद्गार : 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेस प्रारंभ
मडगाव : बहुप्रतीक्षित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे काल गुरुवारी दिमाखात उद्घाटन झाले. ताळगावातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गोव्याच्या नयनरम्य, निसर्गरम्य किनाऱ्यावर होणारी ही राष्ट्रीय स्पर्धा आजवरच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सर्वोत्तम आवृत्ती असेल’ असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले. क्रीडामंत्री गोविंद गावडे, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य अमिताभ शर्मा, राज्याच्या क्रीडा सचिव स्वेतिका सचन, सागच्या कार्यकारी संचालिका डॉ. गीता नागवेकर, आमदार दाजी साळकर, जिल्हा पंचायत सदस्या शायनी ओलिव्हेरा, सरपंच जेनिफर ओलिव्हेरा आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा संचालक अरविंद खुटकर यांनी यावेळी सर्वांचे स्वागत केले.
‘मोगा’मुळे संचारला उत्साह
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर असलेल्या ‘मोगा’च्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला. विद्यार्थी आणि मोगाच्या जयघोषाने स्टेडियम दुमदुमून गेला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानंतर या स्टेडियममध्ये बॅडमिंटन स्पर्धांनाही सुरूवात झाली.
‘वन नेशन, वन स्पिरीट’
‘गोव्यात होणाऱ्या ऐतिहासिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातून आलेले सर्व खेळाडू आणि त्यांच्यासोबत सहकारी वर्गाचे आपण स्वागत करतो, ‘वन नेशन वन स्पिरीट’ या व्हिजनसह पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी फातोर्डा स्टेडियमवर 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, यासाठी सर्वांना आपण आमंत्रित करतो, असे डॉ. सावंत म्हणाले.
आजवरची सर्वोत्तम आवृत्ती
‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचे स्वप्न गेल्या 10 वर्षांपासून पाहत आहोत. आता त्याची पूर्तता होत असल्याचा खूप आनंद वाटतो. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. गोव्याच्या नयनरम्य व निसर्गरम्य किनाऱ्यावर होणारी ही राष्ट्रीय स्पर्धा आजवरच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सर्वोत्तम आवृत्ती असेल’ असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठीही गोवा प्रसिद्ध व्हावे
‘राष्ट्रीय स्पर्धेनंतर भविष्यात आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये चमकण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे’ असे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. गोव्यातील पर्यटन जगप्रसिद्ध आहे. भविष्यात क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठीही गोवा तितकेच प्रसिद्ध व्हावे, अशी आमची इच्छा आहे. खेळाची भावना कायम ठेवत प्रत्येक नागरिक, खेळाडूंनी गोव्यात स्पर्धेसाठी आलेल्या विविध राज्यातील बॅडमिंटनपटूंचे तसेच सपोर्ट स्टाफचे दिलखुलासपणे उत्स्फूर्त स्वागत करावे, अशी विनंती यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
पंतप्रधान मोदींकडे व्यापक दृष्टिकोन : गावडे
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक व्यापक दृष्टिकोन आहे आणि प्रत्येक खेळाडूला ते प्रोत्साहित करतात. क्रीडा क्षेत्रात भारत प्रगती करत आहे. त्या अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत. ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल, याची आम्हाला खात्री आहे, असे यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले.









