ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ब्रिटनची प्रसिद्ध लग्झरी कार निर्माता कंपनी ‘बेंटले’ने ‘म्युलिनर बाकलर’ ही नवीन कार ऑनलाईन लाँच केली आहे. या कारचे वैशिष्टय़ म्हणजे या कारच्या आतील डिझाईन तब्बल 5000 वर्षांपूर्वी पाडलेल्या झाडांच्या लाकडापासून बनविण्यात आले आहे. या प्रकारातील बेंटले फक्त 12 कार बनविणार आहे.
बेंटले ‘म्युलिनर बाकलर’ ही कार जिनिव्हा मोटर शोमध्ये लाँच करणार होती. मात्र, कोरोनाचा विषाणूचा जगभरातील वाढता प्रादुर्भाव पाहता हा ऑटो शो रद्द करण्यात आला होता. त्यामुळे बेंटलेने ही कार ऑनलाईन लाँच केली आहे.
या कारमध्ये 12 सिलेंडरचे इंजिन असून, ते 650 हॉर्सपावरची ताकद आणि 667 एनएमचा टॉर्क तयार करते. या कारमध्ये रिव्हर वूड वापरण्यात आले आहे. हे लाकूड तळे, नद्यांमध्ये 5 हजार वर्षांपासून राहिलेले असते. हे लाकूड पूर्व अँगलियामधून आणण्यात आले आहे. या कारच्या प्रत्येक सीट क्मयुइलटेड पॅटर्नच्या आहेत. यासाठी जवळपास 150000 टाके घालावे लागतात. प्रत्येक बाकलर कार ही हँडमेड असणार आहे. जशी ग्राहकाला हवी तशी ती बनविण्यात येणार आहे. तसेच अशाप्रकारच्या केवळ 12 कारच कंपनी बनविणार आहे. या रुफलेस कारची किंमत 14 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.