बेंगळूर प्रतिनिधी
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश सिंग टिकैत यांच्यावर हल्ला झाला होता. हल्ला करणार्या तीन आरोपींनी आता असा दावा केला आहे की, टिकैत कन्नडमध्ये न बोलल्यामुळे त्यांच्यावर हल्ला केला आहे, असे पोलिस सूत्रांनी गुरुवारी सांगितले. या सर्व आरोपींचे जवाब तपासले जात असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी बेंगळूरमध्ये गांधी भवनात पत्रकार परिषदेत बोलत असताना टिकैत यांच्यावर काळी शाई फेकून हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर लगेच पोलिसांनी भारत रक्षा वेदिके या संघटनेचे अध्यक्ष भरत शेट्टी, तसेच शिवकुमार आणि प्रदीप या तिघांना अटक केली होती.
हल्ला केल्यावर आणि पोलिस पकडून नेत असताना आरोपींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष केला होता. तपास अधिकारी या घटनेकडे पूर्वनियोजित कट म्हणून पाहत आहेत. आरोपींचे वक्तव्य दिशाभूल करणारे असून त्यांच्या या वक्तव्याची अधिक चौकशी केली जाईल, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींना 6 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
शिवकुमार यांने व्यासपीठावर येऊन राकेश टिकैत यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर इतर शेतकरी नेत्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवकुमारवर एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे असेही तपासात असे दिसून आले आहे.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसिरु सेने यांनी आयोजित केलेल्या शेतकरी चळवळ -आत्मनिरीक्षण आणि स्पष्टीकरण बैठक या पत्रकार परिषदेत टिकैत उपस्थित होते. काँग्रेसने या घटनेचे वर्णन कर्नाटक राज्यावर काळा डाग असल्याचे म्हटले आहे.