वृत्तसंस्था / जयपूर
2025 च्या प्रो कब•ाr लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या रोमांचक ठरलेल्या सामन्यात गणेशा हणमंतगोळच्या शानदार चढाईच्या जोरावर बेंगळूर बुल्सने तेलुगू टायटन्सच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला. सामन्यातील शेवटच्या 10 सेकंदांमध्ये हणमंतगोळच्या या कामगिरीमुळे बेंगळूर बुल्सने शानदार विजय नोंदविला. या स्पर्धेतील बेंगळूर बुल्सचा हा चौथा विजय आहे.
बेंगळूर संघातील अलिरेझा मिर्झानने सुपर-10 गुण तसेच 7 गुण मिळविले. गणेशाने मिर्झानला चांगलीच साथ दिली. या विजयामुळे आता बेंगळूर बुल्सने तेलुगू टायटन्सला मागे टाकत फलक तक्त्यात चौथे स्थान मिळविले. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघातील खेळाडूंनी दर्जेदार चढायांवर गुण वसुल केले. आकाश शिंदे आणि भरत यांच्या सुरूवातीच्या चढाया बेंगळूर बुल्सला फायदेशीर ठरल्या तर दीपक शंकर आणि योगेश यांनी तेलुगू टायटन्सतर्फे शानदार खेळ केला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत तेलुगू टायटन्सने बेंगळूर बुल्सवर 14-11 अशी आघाडी मिळविली होती. पण सामन्याच्या उत्तराधार्थ बेंगळूर बुल्सने सुरूवातीला तेलुगू टायटन्सचे सर्वगडी बाद करत पिछाडी भरुन काढली. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना तेलुगू टायटन्सने बेंगळूर बुल्सवर 24-19 अशी आघाडी घेतली होती. दरम्यान तेलुगू टायटन्सच्या अजित पवारला पंचांनी पिवळे कार्ड दाखविले. इराणच्या अलिरझाने तेलुगू टायटन्सचा कर्णधार साहील राणेला बाद केले. यावेळी सामन्याची स्थिती 27-27 अशी बरोबरीत होती. त्यानंतर भरतने सुपर-10 गुण मिळवित आपल्या संघाला पुन्हा आघाडीवर नेले. शेवटच्या दोन मिनिटांमध्ये अलिरझाने सुपर 10 गुण नोंदवून आपल्या बेंगळूर बुल्सला आघाडीवर नेले. गणेशा हणमंतगोळने आपल्या शेवटच्या चढाईवर तेलुगू टायटन्सचा गडी बाद करुन बेंगळूर बुल्सला निर्णायक विजय मिळवून दिला.









