वृत्तसंस्था / जयपूर
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेंगळूर बुल्सने जयपूर पिंक पँथर्सचा 28-23 अशा पाच गुणांच्या फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील जयपूरमधील टप्प्याला प्रारंभ झाल्यानंतर बेंगळूर बुल्सचा हा पहिला विजय आहे.
बेंगळूर बुल्सतर्फे दीपक चहरने 5 गुण तर अलिरझा मिर्झानने आपल्या चढायांवर 8 गुण वसुल केले. यजमान जयपूर पिंक पँथर्सतर्फे नितीनकुमारने 8 गुण नोंदविले पण त्याला त्याच्या सहकार्याकडून पुरेशी साथ मिळू शकली नाही. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत बेंगळूर बुल्सने जयपूर पिंक पँथर्सवर 16-9 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बेंगळूर बुल्सने जयपूर पिंक पँथर्सवर 21-15 अशी बढत मिळविली होती. अखेर सत्याप्पा आणि अलिरझा यांनी आपल्या चढायांवर जयपूर पिंक पँथर्सचे खेळाडू बाद करुन बेंगळूर बुल्सला 28-23 अशा पाच गुणांच्या फरकाने विजय मिळवून दिला. या स्पर्धेतील बेंगळूर बुल्सचा हा सलग तिसरा विजय आहे.









