वृत्तसंस्था / विझाग
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेंगळूर बुल्सने हरियाणा स्टिलर्सचा 40-33 अशा सात गुणांच्या फरकाने पराभव केला.
या सामन्यात बेंगळूर बुल्स संघातील अलिरझा मिर्झेनची कामगिरी शानदार झाली. त्यांनी या स्पर्धेतील आपले सलग दुसऱ्यांदा सुपर 10 गुण मिळविले. दीपक शंकर, कर्णधार योगेश यांनी बेंगळूर बुल्सची बचावफळी भक्कमपणे सांभाळली. हरियाणा स्टिलर्सतर्फे शिवम पाठारेने आपल्या चढाईवर गुणांचे खाते उघडले. त्यानंतर अलिरझाने आपल्या शानदार आक्रमक खेळाच्या जोरावर बेंगळूर बुल्सला आघाडीवर नेले. त्याने हरियाणा स्टिलर्सचे सर्वगडी बाद करत बेंगळूर बुल्सला 9-2 अशी आघाडी मिळवून दिली. मयांक सैनीने आपल्या चढाईवर सहा गुण वसुल करत बेंगळूर बुल्सची आघाडी थोडी कमी केली. पहिल्या विश्रांतीच्या कालावधीनंतर बेंगळूर बुल्सने हरियाणा स्टिलर्सवर 13-8 अशी बढत घेतली होती. खेळाला पुन्हा प्रारंभ झाल्यानंतर बेंगळूर बुल्सने आणखी दोन गुण वसुल केले. त्यानंतर हरियाणा स्टिलर्सने बेंगळूर बुल्सचे सर्वगडी बाद करत त्यांची आघाडी कमी केली. सामन्याच्या मध्यंतरावेळी बेंगळूर बुल्सने हरियाणा स्टिलर्सवर 21-18 अशी तीन गुणांची आघाडी मिळविली होती. अलिरझाच्या आक्रमक चढायांवर हरियाणा स्टिलर्सचे दुसऱ्यांदा सर्वगडी बाद झाले. त्यामुळे बेंगळूर बुल्सने 29-22 अशी आघाडी मिळविली होती. अलिरझाने सुपर 10 गुण मिळविल्याने बेंगळूर बुल्सने ही लढत अखेर 40-33 अशा गुण फरकाने जिंकली.









