तांत्रिक अडचणी निवारणासाठी रेल्वे खाते प्रयत्नशील
बेळगाव : बहुचर्चित बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी केली होती. नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या अडचणी आता दूर केल्या असून लवकरच बेंगळूर-बेळगाव असा आलिशान प्रवास करता येणार आहे.
बेंगळूर-बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी, यासाठी मागील दीड ते दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. सध्या सुरू असलेल्या बेंगळूर-धारवाड वंदे भारतचा विस्तार बेळगावपर्यंत करण्यासाठीचा प्रस्ताव होता. डिसेंबर 2023 मध्ये यासाठी चाचणीदेखील घेण्यात आली. सकाळी बेंगळूर येथून निघालेली वंदे भारत दुपारी बेळगावला पोहोचेल व त्यानंतर पुन्हा बेंगळूरच्या दिशेने रवाना होईल, असे तेव्हा वेळापत्रक होते.
परंतु, वंदे भारतला बेंगळूरला पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याने हा प्रस्ताव बारगळला. मागील दीड वर्षापासून वंदे भारत सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील यश आले नव्हते. तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्याने आता वंदे भारत बेळगावपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी काही दिवसांपूर्वी लवकरच वंदे भारतचा प्रवास करता येईल, असे आश्वासन बेळगावकरांना दिले होते. भारतीय रेल्वेने वंदे भारत सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वंदे भारत सुरू होण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास बेळगावच्या प्रवाशांना अवघ्या आठ तासांमध्ये बेंगळूरला पोहोचता येणार आहे.









