बेळगाव : दिवाळीनिमित्त नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-बेळगाव मार्गावर विशेष रेल्वे फेरीची घोषणा केली आहे. यामुळे बेंगळूरच्या प्रवाशांना बेळगावला व बेळगावच्या प्रवाशांना बेंगळूरला पोहोचणे सहज शक्य होणार आहे. रेल्वे क्रमांक 06503 एक्स्प्रेस शुक्रवार दि. 17 रोजी सायंकाळी 5.30 वा. बेंगळूरच्या एसएमव्हीटी रेल्वेस्थानकातून निघणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वा. बेळगावला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात बुधवार दि. 22 रोजी सायंकाळी 5.30 वा. बेळगावमधून रेल्वे निघणार असून दुसऱ्या दिवशी बेंगळूरला पहाटे 5 वा. पोहोचेल. या रेल्वेला लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळीसह इतर थांबे देण्यात आले आहेत. एकूण 19 डबे जोडण्यात आल्याने प्रवाशांची सोय हाणार आहे.
मुंबईलाही विशेष रेल्वेची गरज
नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूरप्रमाणेच मुंबई-पुणे या दोन शहरांसाठी विशेष रेल्वे फेरी सुरू करण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. सध्या धावत असलेल्या मुंबईच्या दोन्ही एक्स्प्रेसचे बुकिंग दिवाळीदरम्यान फुल्ल झाले आहे. त्यामुळे एखादी विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.









