वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता (वय 29 वर्षे) हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. शूटिंगवरून परतत असताना तिच्या वाहनाला ट्रकने धडक दिल्यानंतर ती रस्त्यावर कोसळली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली डोके चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सुचंद्रा दासगुप्ता यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंब आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुचंद्रा दासगुप्ताने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बंगाली मालिका ‘गौरी’मध्ये सह-अभिनेत्री म्हणून काम केले होते. या मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यामुळे तिने आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.
सुचंद्रा दासगुप्ता शनिवारी रात्री शूटिंग संपवून घरी परतत होती. दुचाकीवरून जात असताना अचानक एक सायकलस्वार समोर आला. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी दुचाकीस्वाराने अचानक ब्र्रेक लावल्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर सुचंद्रा दुचाकीवरून खाली पडताच ट्रकचे चाक तिच्या डोक्यावरून गेले. यात सुचंद्राचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून चालकाला ताब्यात घेतले आहे. सुचंद्राच्या निधनामुळे बंगाली सिनेजगत शोकसागरात बुडाले आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. संतप्त नागरिकांनी रास्तारोको करून संताप व्यक्त केला.









