वृत्तसंस्था/ पाटणा
2024 च्या प्रो कबड्डी लीग हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सचा 41-36 अशा 5 गुणांच्या फरकाने पराभव करत प्ले ऑफ गटासाठीचे आपले आव्हान जिवंत ठेवले. हरियाणा स्टीलर्सतर्फे शिवम पाटेरीने 12 तर सिद्धार्थ देसाईने 11 गुण नोंदविले. या सामन्यात बंगाल वॉरियर्सतर्फे कर्णधार मनिंदरसिंगने आपल्या चढायावर 13 गुण मिळविले.
सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळ झाला आणि पहिल्या 10 मिनिटामध्ये हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सवर 9-8 अशी 1 गुणाची आघाडी मिळविली होती. त्यानंतर विनय आणि शिवम यांच्या आक्रमक चढायामुळे हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सवर 16-12 अशी बढत मिळविली होती. बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदरसिंगने आपल्या सुपर रेडवर तीन महत्त्वाचे गुण मिळविले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सवर 18-16 अशी बढत मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर सिद्धार्थ देसाईच्या शानदार चढाईमुळे हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सचे सर्व गडी बाद केले. हरियाणा स्टीलर्सने यावेळी 24-22 अशी 2 गुणांची आघाडी घेतली होती. सिद्धार्थच्या आक्रमक खेळामुळे 33 व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सचे दुसऱ्यांदा सर्व गडी बाद झाले. सामना संपण्यास 7 मिनिटे बाकी असताना हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सवर 37-29 अशी 8 गुणांची भक्कम आघाडी घेतली होती. शेवटच्या 2 मिनिटांच्या कालावधीत मनिंदरसिंगने आपल्या सुपर 10 च्या जोरावर हरियाणा स्टीलर्सची आघाडी थोडी कमी केली. पण अखेर हरियाणा स्टीलर्सने हा सामना 5 गुणांच्या फरकाने जिंकून बंगाल वॉरियर्सचे आव्हान संपुष्टात आणले.









