ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास यशाचे शिखर सर करता येते. यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वासही तितकाच महत्वाचा. घौडदौडीत घरातील मंडळी व मित्र मंडळी यांची साथ लाभली तर हे शिवधनुष्य लिलया पेलले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगेमश्वर तालुक्यातील साडवली गावचे सुपुत्र प्रशांत संभाजी सुर्वे. सुर्वे यांनी कबड्डी खेळाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवला आहे. बंगाल वॉरियर्स कब•ाr संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी सुर्वे यांची निवड झाली आहे. देवरूख संगमेश्वर मार्गावर वसलेल्या साडवली सह्याद्रीनगर येथे सर्वसामान्य कुटुंबात प्रशांत सुर्वे यांचा जन्म झाला. वडिलांनी देवरूख एस.टाङ आगारात चालक म्हणून सेवा वाहिली. सुर्वे यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शि
क्षण देवरूख क्र. 3 शाळेत, आठवी ते दहावी कोसुंब हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी येथील गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात झाले. त्यांचे मोठे बंधू प्रमोद सुर्वे हे कबड्डीपटू होते. भावाकडून प्रेरणा घेतली. प्रमोद सुर्वे यांच्या पाठोपाठ प्रशांत यांनी देखील देवरूख सह्याद्रीनगर संघातून कबड्डी खेळाचा श्रीगणेशा केला. खेळातील बारकावे आत्मसात करत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. सह्याद्रीनगर मित्र मडळाचे अध्यक्ष सुखदेव जाधव, विलास शिंदे यांनी आपल्याला खेळासाठी प्रोत्साहन दिल्याचे सुर्वे यांनी नमुद केले .
महाविद्यालयीन जीवनातही सुर्वे यांनी कबड्डी खेळात सातत्य ठेवले. सरावावर विशेष भर दिला. त्यामुळे मुंबई विद्यापीठ संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. सुर्वे यांनी कर्णधार पदाला साजेसा खेळ करत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. यानंतर मुंबई येथील अंकुर स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून सुर्वे यांनी दबदबा कायम ठेवला. क्लबचे ऑफीसर अनिल घाटे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाच्या जोरावर मुंबई येथील युनियन बँकेत नोकरी मिळाली. हाच आपल्या जीवनाचा टर्निंट पॉईट असल्याचे सुर्वे यांनी स्पष्ट केले आहे. सुर्वे हे युनियन बंकेत सध्या सिनियर मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.
सुर्वे यांनी युनियन बँक स्पोर्टस बोर्डमधून 7 नॅशनल कबड्डी स्पर्धा खेळल्या आहेत. शक्ती व युक्तीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. अनुभवाची शिदोरी सुर्वे यांच्याजवळ आहे. त्यांच्या या अनुभवाची दखल घेत सुर्वे यांच्यावर प्रशिक्षक पदाची धुरा देण्यात आली. युनियन बँक जिल्हा पुरूष संघाचे कोच म्हणून चोख कामगिरी बजावली आहे. गतवर्षी चिपळूण येथे राज्य अजिंक्यद स्पर्धा पार पडली. अंतिम सामना मुंबई विरूध्द रत्नागिरी जिल्हा असा रोमहर्षक झाला. यात रत्नागिरी जिल्ह्याचा संघ विजयी झाला. रत्नागिरी जिल्हा संघाने 67 वर्षानंतर प्रथमच विजेतेपद पटकावल्याचे प्रशांत सुर्वे यांनी अभिमानाने नमुद केले आहे. अयोध्या नॅशनल स्पर्धेत हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
सुर्वे यांनी कबड्डी क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण करत साडवली गावासह संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. लाखो रसिक प्रेक्षकांच्या नजरा आज प्रो कबड्डी स्पर्धेकडे लागून राहिल्या आहेत. चित्तथरारक पकड, चढाई पाहण्यासाठी रसिक आतुर झाले आहेत. सुर्वे यांच्या देदीप्यमान कामगिरीची दखल घेत बंगाल वॉरिअर्स संघाच्या असिस्ंटट कोचपदी नियुक्ती करण्यात आली. सिजन 9 व 10 मध्ये सुर्वे यांनी असिस्टंट कोच भूमिका यशस्वीपणे सांभाळली. ऑक्टोबर महिन्यात प्रो कबड्डीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी बंगाल वॉरियर्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदाची जबाबदारी प्रशांत सुर्वे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात भारतातील सर्व स्टार खेळाडूचे शिबीर घेतले जाणार आहे. यामधून कमीत कमी 16 व जास्तीत जास्त 25 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. यातीलच खेळाडू प्रो कबड्डी स्पर्धेत बंगाल वॉरियर्स संघाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे सुर्वे यांनी नमुद केले आहे.
तालुका कबड्डी असोसिएशनची महत्वपूर्ण भूमिका
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील खेळाडू मेहनती आहे. चांगली शरीरयष्टी, चपळता देखील आहे. खेळाडू मेहनत देखील भरपूर घेतात. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने टॅलेंट असून देखील ते मागे पडतात. प्रत्येक तालुका कबड्डी असोसिएशनची भूमिका महत्वपूर्ण आहे. तालुका कबड्डी असोसिएशनचे पुढाकार घेऊन खेळाडूंसाठी विविध स्पर्धा, खेळातील बारकावे समजून देण्यासाठी शिबिरे आयोजित केली पाहिजेत. फिटनेस ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यायचा हे पटवून देण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले पाहिजे. उगवते तारे हेरून त्यांना दत्तक घेणे तितकेच महत्वाचे असल्याचे प्रशांत सुर्वे सांगतात.
माने, बने, निकम यांचे आभार
खेळाडू अथवा कलाकाराला पाठीवर कौतुकाची थाप महत्वाची असते. कौतुकाच्या थापेमुळे त्यांना ऊर्जा मिळते. माझ्या यशाच्या प्रत्येक पायरीवर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार डॉ. सुभाष बने, विद्यमान आमदार शेखर निकम यांनी पाठीवर थाप देत कौतुक केले. यामुळे आपल्याला ऊर्जा मिळाल्याचे सुर्वे म्हणाले.
बंगाल वॉरियर्स संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न
मोठ्या विश्वासाने बंगाल वारियर्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदाची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली आहे. हा विश्वास आपण सार्थ ठरवणार आहे. संघाला विजेतेपद मिळून देण्याचे आपले स्वप्न असल्याचे प्रशांत सुर्वे यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील खेळाडूंसाठी भविष्यात अॅकॅडमी सुरू करणार
आपण ज्या मातीत वाढलो त्या मातीचे आपण देणं लागतो. जन्मभूमी असलेल्या साडवली व संगमेश्वर तालुक्याचा सार्थ अभिमान आहे. कबड्डी खेळात तालुक्यातून जास्तीत जास्त खेळाडू घडावेत, त्यांनी देशाचे प्रतिनिधीत्व करावे अशी आपली मनोमन इच्छा आहे. कबड्डी खेळासाठी संगमेश्वर तालुक्याचे नाव अग्रक्रमाने घेतले गेले पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यात स्पोर्टस अॅकॅडमी सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
– सुरेश करंडे, देवरूख









