वृत्तसंस्था/ पुणे
2023 च्या 10 व्या प्रो-कबबड्डी लिग हंगामातील येथे बंगाल वॉरियर्स आणि युपी योद्धाज यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला आणि अखेर तो ‘टाय’ राहिला. या दोन्ही संघांनी 37-37 असे गुण नोंदविले. चालू वर्षीच्या प्रो-कबबड्डी लिग हंगामातील हा दुसरा सामना बरोबरीत राहिला आहे.
बंगाल वॉरियर्स आणि युपी योद्धाज यांच्यातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात सुरिंदर गिल आणि नितीन कुमार यांची कामगिरी चमकदार झाली. बंगाल वॉरियर्सच्या सुरिंदर गिलने आपल्या सुपर रेडवर युपी योद्धाजला रोखले होते. त्यानंतर बंगाल वॉरियर्सच्या मनिंदरसिंग, नितीन कुमार व प्रदीप नरवाल यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर हा सामना बरोबरीत राखण्यात यश मिळविले. प्रदीप नरवाल हा युपी योद्धाजचा कर्णधार आहे. या सामन्यामध्ये युपी योद्धाजला पहिला गुण मिळविण्यासाठी तब्बल 12 मिनिटे थांबावे लागले. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत विजय मलिकच्या शानदार कामगिरीच्या जोरावर युपी योद्धाजने बंगाल वॉरियर्सवर 18-14 अशा 4 गुणांची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या पूर्वार्धात प्रतिस्पर्धी संघांना सर्व गडी बाद करता आले नाहीत. सामन्याच्या उत्तरार्धात गुरुदीपने मनिंदरसिंगला रोखण्यात यश मिळविले. यावेळी युपी योद्धास 21-17 अशा 4 गुणांनी आघाडीवर होता. त्यानंतर श्रीकांत जाधवच्या कामगिरीमुळे बंगाल वॉरियर्सने युपी योद्धासचे सर्व गडी बाद केले. बंगाल वॉरियर्सने यावेळी युपी योद्धाजवर 24-23 अशी नाममात्र आघाडी घेतली होती. सामना संपण्यास 5 मिनिटे बाकी असताना युपी योद्धाजने बंगाल वॉरियर्सवर 35-30 अशी 5 गुणांची आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर बंगाल वॉरियर्सने मनिंदरसिंगच्या चढायावर 5 गुण मिळविले. त्यानंतर शेवटच्या मिनिटाला दोन्ही संघ 36-36 असे बरोबरीत राहिल्याने या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. बंगाल वॉरियर्सचा नितीनकुमार हा या सामन्यातील सर्वोत्तम कबबड्डीपटू ठरला.









