झारखंडविरुद्ध रणजी उपांत्यपूर्व लढत अनिर्णीत, बंगाल उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
क्रिकेटपटू मनोज तिवारीने गेल्या 88 वर्षात कुणाला जमला नाही, असा पराक्रम नेंदवताना शतकी खेळी केली. तो सध्या बंगालमध्ये मंत्रिपदावर आहे. अनिर्णीत राहिलेल्या रणजी करंडक सामन्यात बंगालने झारखंडवर पहिल्या डावात मिळविलेल्या आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी सामना अनिर्णीत राहणार हे निश्चित होते. मात्र तिवारीचे शतक (नाबाद 136) हे या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात तिवारी हा क्रीडा व युवजन सेवा मंत्रिपद सांभाळत असून त्याचे कामही तो या सामन्यावेळी पाहत होता. 36 वर्षीय तिवारीने आपल्या खेळीत 19 चौकार, 2 षटकार मारले. पहिल्या डावात त्याने 73 धावांचे योगदान दिले होते. बंगालच्या दुसऱया डावात अन्य काही फलंदाजांनीही चांगले योगदान दिले. शाहबाज अहमद (46), अनुष्टुप मजुमदार (38), अभिषेक पोरेल (34) यांचा त्यात समावेश आहे. बंगालने दुसऱऱया डावात 7 बाद 318 धावा जमविल्या. त्याआधी त्यांनी पहिला डाव 7 बाद 773 धावांवर घेषित केल्यानंतर झारखंडचा पहिला 298 धावांत गुंडाळला होता. पण फॉलोऑन न देता बंगालने दुसरा डाव पुढे चालू केला होता. डावात झारखंडच्या शाहबाज नदीमने 59 धावांत 5 बळी मिळविले. 14 जूनपासून बंगाल व मध्यप्रदेश यांच्यात उपांत्य लढत होणार आहे. त्याच दिवशी मुंबई व उत्तर प्रदेश यांच्यात दुसरी उपांत्य लढत होईल.
संक्षिप्त धावफलक ः बंगाल प.डाव 7 बाद 773 डाव घोषित, झारखंड प.डाव 298, बंगाल दु.डाव 7 बाद 318 (मनोज तिवारी नाबाद 136, शाहबाज अहमद 46, मजुमदार 38, शाहबाज नदीम 5-59).
पंजाबला हरवून मध्यप्रदेश उपांत्य फेरीत
कर्नाटकातील अलुर येथे झालेल्या रणजी सामन्यात कुमार कार्तिकेयच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर मध्यप्रदेशने पंजाबचा 10 गडय़ांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कार्तिकेयने पंजाबच्या दुसऱया डावात 50 धावांत 6 बळी मिळवित प्रथमश्रेणीतील आपली दुसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. सारांश जैनने 100 धावांत 4 बळी मिळवित त्याला उत्तम साथ दिल्याने पंजाबचा दुसरा डाव 203 धावांत आटोपला. अनमोल मल्होत्राने 34, सिद्धार्थ कौलने 31, मयांक मार्कंडेने 33 धावा जमविल्या. त्यानंतर मध्यप्रदेशने बिनबाद 26 धावा जमवित 10 गडय़ांनी विजय साकार केला.
संक्षिप्त धावफलक ः पंजाब 219 व 203, मध्यप्रदेश 397 व बिनबाद 26.









