रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी आरोपी
वृत्तसंस्था/ कोलकाता
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालमधील कोट्यावधी रुपयांच्या रेशन वितरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक केली आहे. तपास यंत्रणेने यासंबंधी शुक्रवारी माहिती दिली आहे. मोठ्या कटाचा मी शिकार ठरलो आहे असा दावा मलिक यांनी केला आहे.
ज्योतिप्रिय मलिक यांची 17-18 तासांहून अधिक काळापर्यंत चौकशी केल्यावर ईडीने शुक्रवारी पहाटे पीएमएलए अंतर्गत अटकेची कारवाई केली आहे. ज्योतिप्रिय मलिक यांना एका स्थानिक न्यायालयासमोर हजर करत ईडीने कोठडीची मागणी केली आहे.
ईडीने ज्योतिप्रिय मलिक यांच्या ठिकाणांवर गुरुवारी छापे टाकले होते. मध्य कोलकाता येथील एमहर्स्ट स्ट्रीटवर असलेल्या मलिक यांच्या निवासस्थानीही झडती घेतली होती. सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि कोविड लॉकडाउनदरम्यान अन्नधान्य वितरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीकडून झालेली ही कारवाई म्हणजे सूडाचे राजकारण आहे. हा प्रकार विजयादशमीच्या दिनी बंगालच्या संस्कृतीवर झालेला हा हल्ला आहे. दुर्गापूजेपूर्वी आमच्या नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. मनरेगा अंतर्गत निधी जारी करण्याची मागणी आम्ही लावून धरल्याने केंद्र सरकारकडून अशाप्रकारे सूडाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप तृणमूल नेत्या आणि राज्याच्या मंत्री शशि पांजा यांनी केला आहे.









