पश्चिम बंगालच्या विधानसभेत प्रस्ताव संमत : ममता बॅनर्जींचे राज्यपालांना आव्हान
वृत्तसंस्था /कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभेत बंगाल दिनावरून गुरुवारी प्रस्ताव संमत झाला आहे. दरवर्षी 15 एप्रिल रोजी बंगाली नववर्षाच्या दिनी बंगाल दिन साजरा केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. रविंद्रनाथ टागोरांच्या ‘बांग्लार माटी, बांग्लार जल’ गीताला बंगालचे राज्य गीत घोषित करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. विधानसभांकडून संमत प्रस्तावांना राजभवनाकडून मंजुरी मिळण्यास होत असलेल्या विलंबाबद्दलही त्यांनी वक्तव्य केले आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याकडे अधिक अधिकार आहेत का लोकांकडे हे आम्ही पाहणार आहोत असे वक्तव्य करत ममता बॅनर्जी यांनी एकप्रकारे राज्यपालांना आव्हान दिले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत प्रस्तावाच्या बाजूने 167 मते पडली आहेत. तर विरोधात 62 भाजप आमदारांनी मतदान केले आहे. तर आयएसएफच्या एकमेव आमदाराने मतदानावेळी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संबंधित प्रस्ताव नियम 167 अंतर्गत विधानसभेत सादर करण्यात आला होता. 20 जून रोजी बंगाल दिन साजरा करण्यात यावा, कारण याच दिवशी बंगाल विधानसभेने फाळणीच्या बाजूने मतदान केले होते असे म्हणत भाजपने प्रस्तावाला विरोध केला आहे.









