महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोंबर रोजी होणार शुभारंभ
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये शासन आपल्या दारी, शासकीय योजना घरोघरी या कार्यक्रमाचा शुभारंभ महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोंबर रोजी राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यांमध्ये एकाच वेळी होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, या अभियानांतर्गत नागरिकांना एका छताखाली विविध शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना तहसील कार्यालय, पंचायत समितीचे ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, कृषी, घरकुल, आरोग्य, एकात्मिक बाल विकास व भुमिअभिलेख आधी विभागांतर्गत सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री व मुख्यमंत्री किसान योजना नाव दुरूस्ती व केवायसी अपडेट कॅम्पचे आयोजन, अपंग बांधवांना शासकीय योजना देणेसाठी कॅम्पचे आयोजन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील जमीनींचे खंड भरून घेणेसाठी कॅम्पचे आयोजन, गायरान जमीनीवरील अतिक्रमणे नियमानकूल करणेसाठी कॅम्पचे आयोजन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
यामध्ये रेशन कार्ड, संजय गांधी योजना, सुकन्या योजना आदी योजनांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने महावितरण घरगुती कृषी व औद्योगिक वीज जोडणी, डीपीडीसी अंतर्गत कामे, भूमापन, मालमत्ता पत्रिका, कृषी विभागाचे अवजारांचे वाटप, बियाणे, औषधे वाटप, महाजीबीटी नोंदणी, पशु तपासणी शिबिर, पशुसंवर्धन प्रशिक्षण, रमाई इंदिरा, यशवंतराव चव्हाण, मुक्त वसाहत योजना, अहिल्याबाई होळकर, धनगर घरे योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास, मृदा हेल्थ कार्ड, शेतकरी सहली, पालकमंत्री व मातोश्री प्राण्यांची योजना शुभारंभ लंबी आजारावर उपाययोजना करण्यासाठी मतदार संघांमध्ये फिरते पथक (मोबाईल व्हॅन) लोकार्पण आदी करण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील अंदाजे 5 हजार घरकुले, 5 हजार नवीन रेशन कार्ड, संजय गांधी व वृद्ध काळ विधवा पेन्शन योजना अधिक लाभार्थ्यांना देण्यात येणार असून मोती बिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार संघातील 50000 लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ अंबाबाई देवालय, राधानगरी येथे दुपारी 1.00 वाजता होणार आहे.