नवीन आधारकार्डचे काम ठप्प : नागरिकांची घालमेल, शासकीय सुविधांपासून दूर
बेळगाव : नवीन आधारकार्डचे काम ठप्प झाल्याने अनेकांना आधारकार्डविना वंचित रहावे लागले आहे. विशेषत: शासकीय सुविधांपासून दूर रहावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरातील काही पोस्ट कार्यालयात नवीन आधारकार्डचे काम सुरू आहे. मात्र याठिकाणी दररोज मोजक्याच आधारकार्डचे काम केले जात आहे. विशेषत: नवीन आधारकार्ड करणाऱ्या बालकांना आधारपासून वंचित रहावे लागत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे. शासकीय शैक्षणिक आणि इतर सर्वच कामांसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र कर्नाटक वन, बेळगाव वन आणि ग्रामवनमध्ये आधारकार्डची कामे थांबली आहेत. केवळ आधारकार्ड अपडेट केले जात आहे. मात्र नवीन आधारकार्ड आणि आधारकार्ड दुरुस्तीची कामे पूर्णपणे थांबली आहेत. त्यामुळे अनेकांना आधार कार्डविना रहावे लागत आहे.
काम पूर्ववत सुरू करण्याची मागणी
लहान बालकांचे आधारकार्ड काढण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे. मात्र बेळगाव वन,कर्नाटक व आणि ग्रामवनमध्ये ही सुविधा ठप्प झाली आहे. केवळ काही पोस्ट कार्यालयात ही कामे केली जात आहेत. मात्र याठिकाणी मोजक्याच नागरिकांची ऑनलाईन अर्ज घेतले जात आहेत. उर्वरितांना माघारी परतावे लागत आहे. आधारकार्डचे काम आणि दुरुस्ती पूर्ववतपणे कर्नाटक वन, बेळगाव वन आणि ग्रामवन केंद्रांमध्ये सुरू करावे, अशी मागणी होत आहे.









