कामे ठप्प : अन्नभाग्यपासून वंचित, धान्यासाठी भटकंती
बेळगाव : मागील कित्येक दिवसांपासून नवीन रेशनकार्डचे काम ठप्प आहे. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांना रेशनपासून आणि अन्नभाग्य योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. परिणामी दारिद्र्या रेषेखालील नागरिकांना धान्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अंत्योदय कार्डधारकांना दरमहा 35 किलो तांदूळ दिला जातो. बीपीएल कार्डधारकांना 10 किलो तांदूळ जाहीर करण्यात आला होता. यापैकी 5 किलो तांदूळ वाटप केला जातो. उर्वरित 5 किलो तांदळाची रक्कम दिली जाते. मात्र, अनेक जणांकडे रेशनकार्डच नसल्याने अन्नभाग्यपासून दूर रहावे लागले आहे. शिवाय नवीन रेशनकार्डसाठी अर्ज स्वीकृतीदेखील बंद ठेवली आहे. त्यामुळे दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांनी जावे कोठे? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तातडीने नवीन रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
तातडीने नवीन रेशनकार्डसाठी अर्जस्वीकृती सुरू करावी
काँग्रेस सरकारने जुलैपासून अन्नभाग्य योजना सुरू केली आहे. या अंतर्गत दर महिना 5 किलो तांदूळ आणि 5 किलो तांदळाऐवजी रक्कम दिली जात आहे. मात्र, अनेक गोरगरीब कुटुंबांकडे बीपीएल कार्ड नसल्याने या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे या लाभाथ्यर्नां आता नवीन रेशनकार्डच्या कामाची प्रतीक्षा लागली आहे. तातडीने नवीन रेशनकार्डसाठी अर्जस्वीकृती सुरू करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
कुटुंब विभक्त नसतानाही स्वतंत्र रेशनकार्ड
जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांनी कुटुंब विभक्त नसतानाही स्वतंत्र रेशनकार्ड मिळविले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र रेशनकार्ड मिळविणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे लाभार्थी अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेऊ लागले आहेत. अशांवर अन्न व नागरीपुरवठा खाते नजर ठेवणार आहे.









