गॅरंटी योजना सुसाट, सर्व्हर डाऊनची समस्या, कागदपत्रांसाठी धडपड
बेळगाव : सरकारने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी शक्ती योजना, अन्नभाग्य, गृहज्योती आणि गृहलक्ष्मी योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे अनिवार्य आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची धडपड सुरू आहे. तहसीलदार कार्यालयात लाभार्थ्यांची वर्दळ वाढू लागली आहे. गृहज्योती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंद आवश्यक आहे. अन्नभाग्य योजनेसाठी ई-केवायसी गरजेची आहे. मात्र बहुतांश लाभार्थ्यांची ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे अन्नभाग्य योजनेत अडचणी येत आहेत. गृहज्योतीच्या ऑनलाईन अर्जासाठी सर्व्हर डाऊनची समस्या सातत्याने त्रासदायक ठरू लागली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ऑनलाईन सेंटरच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.
गृहज्योती, अन्नभाग्य योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र शासकीय कागदपत्रांअभावी अडचणी येऊ लागल्या आहेत. काही नवीन वीज मीटरांची नोंद नसल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यात अडथळा येऊ लागला आहे. त्यामुळे ग्राहकांना नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. अन्नभाग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची ई-केवायसी केलेली नाही. काही लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत. त्यामुळे लाभार्थी शासकीय कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी धडपडत आहेत. गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड, मतदान कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. मात्र काही लाभार्थ्यांकडे कागदपत्रे नाहीत. काही लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये दुरुस्तीचा अभाव आहे. त्यामुळे लाभार्थी कागदपत्रांसाठी धडपडताना दिसत आहेत. ऑनलाईन सेंटरवर सर्व्हर डाऊन आणि इतर तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे.
आधार कार्ड दुरुस्तीला वेग
गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड गरजेचे आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये मोबाईल क्रमांक नाही तर काही लाभार्थ्यांच्या नावात किंवा पत्त्यात बदल करायचा आहे, असे लाभार्थी बेळगाव वनमध्ये आधारकार्डच्या दुरुस्तीसाठी गर्दी करू लागले आहेत. शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास प्रथमत: आधारकार्ड आवश्यक आहे. मात्र काहींच्या आधारकार्डमध्ये दुरुस्तीमुळे अडचणी येत आहेत.









