जिल्ह्यातून आतापर्यंत 8 हजार लाभार्थ्यांची नोंद : योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट
बेळगाव : काँग्रेस सरकारच्या पाचव्या म्हणजेच युवा गॅरंटी योजनेसाठी जिल्ह्यातून 8 हजार लाभार्थी तरुणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान सरकारने राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे अर्ज केलेले लाभार्थी आता निधीच्या प्रतीक्षेत आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी गॅरंटी योजना सुरू करण्यात आली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात पदवी-डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पदवी-डिप्लोमा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर नोकरी न मिळालेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेंतर्गत 2023 मध्ये पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपर्यंत बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. युवा निधी योजनेतील नोंदणीला गती देण्याचे उद्दिष्टही सरकारने ठेवले आहे.
सरकारने पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. शक्ती, गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्नभाग्य आणि त्यापाठोपाठ आता युवा निधीचीही अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअंतर्गत पदवीधर तरुणांना 3 हजार तर डिप्लोमाधारकांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लाभार्थी तरुणांनी अर्ज केले आहेत. सेवासिंधू पोर्टलवर मोफत अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज दाखल केलेले लाभार्थी युवा निधीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात पदवीधर आणि डिप्लोमाधारकांची संख्या मोठी आहे. या सर्व लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी शासनाची धडपड सुरू आहे. कर्नाटक वन, बेळगाव वन आणि बापुजी सेवा केंद्रांवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात 12 जानेवारीपासून युवा निधीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. यामध्ये पारदर्शकता रहावी यासाठी डेबिटीद्वारे निधी दिला जात आहे.
टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना निधी वितरित
26 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. राज्यात युवा निधीचा शुभारंभ झाला असून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना निधी दिला जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाही लवकरच निधी दिला जाणार आहे.
– चिदानंद बाके, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी









