प्रशासनाच्यावतीने आवश्यक तयारीचा घेतला आढावा
बेळगाव : राज्य सरकारच्या अन्नभाग्य, गृहज्योती, गृहलक्ष्मी, शक्ती व युवानिधी या पाच महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थींचा मेळावा सोमवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सरदार्स हायस्कूल मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. लाभार्थींच्या मेळाव्यासाठी सरदार्स हायस्कूल मैदानावर मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी आमदार राजू सेठ, पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा कोळी समाजाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे आदींसह विविध अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी सरदार्स हायस्कूल मैदानाला भेट देऊन तयारीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकही झाली.
या मेळाव्यासाठी पाचही महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था करावी, आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके व रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी बोलताना आमदार राजू सेठ म्हणाले, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव उत्तर, दक्षिण व ग्रामीण मतदारसंघातील गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना मेळाव्यासाठी निमंत्रित करावे. याबरोबरच गॅरंटी योजनांच्या लाभार्थ्यांना मेळाव्यासाठी बोलाविण्यात यावे. समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मेळाव्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांचे जेवण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. बैठकीत कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे श्रीशैल कंकणवाडी, महिला व बालकल्याण खात्याचे बसवराज, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. याचवेळी रविवारी सरदार्स हायस्कूल मैदानावर होणाऱ्या अंबिगर चौडय्या जयंती कार्यक्रमाच्या तयारीचीही पाहणी करण्यात आली.









