बँकेत हेलपाटे घालून परतावे लागते रिकाम्या हाती
प्रतिनिधी /पणजी
सरकारच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील गेल्या 3 महिन्यांची रक्कम लाभार्थींना मिळाली नसल्याने त्यांची अडचण झाली असून बँकेत पैशांसाठी हेलपाटे मारूनही त्यांचे पैसे खात्यात जमा झाले नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे वृद्ध लाभार्थ्यांमध्ये नाराजी प्रकट होत आहे.
सुमारे 60 वर्षांवरील वृद्ध व्यक्तांना सदर योजनेतून मासिक ठराविक रक्कम देण्यात येते ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होते. तेथून लाभार्थी रक्कम काढून तिचा वापर करतात. सदर रक्कम रु. 2000 ते रु. 2500 च्या आसपास असून ती औषध, खाणöपिणे यावरच खर्च होते आणि ती त्यांना पुरत नाही अशीही तक्रारी आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2022 या नवीन वर्षातील 3 महिन्यांची रक्कम त्यांना मिळालेली नाही. आज मिळेल, उद्या मिळेल म्हणून मोठय़ा आशेने ती वृद्ध मंडळी बँकेत जातात परंतु रक्कम आली नसल्याने त्यांना निराश अवस्थेत हात हलवत परतावे लागते.
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सदर रक्कम लवकरात लवकर मिळण्याचे आश्वासन दिले असून गरजूंना आर्थिक लाभ मिळावा आणि अपात्र लाभार्थी शोधून काढण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची महिती दिली. विधानसभा निवडणूक आल्याने आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे योजनेतील लाभार्थींची रक्कम प्रलंबित राहिल्याचे सुत्रांनी सांगितले. आता आचारसंहिता संपली असून तीन महिन्यांची रक्कम लाभार्थींना लवकरच मिळेल असे सांगण्यात आले. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून पुरेसा निधी नसल्यामुळे सदर आर्थिक सहाय्याची रक्कम प्रलंबित राहिल्याची माहिती सुत्रांनी दिली. सरकारने या संदर्भात खुलासा करावा अशी मागणी होत आहे.








