मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : तीन महिन्यांचे रु.825 खात्यात होणार जमा,राज्यातील 11 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अंत्योदय अन्न योजनेतील शिधाधारकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेत एलपीजी सिलिंडरवर अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर या योजनेतील गत तीन महिन्यांचे रु. 825 चे आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल जातील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नागरी पुरवठा खात्यातर्फे पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात काल शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते अंत्योदय अन्न योजनेतील शिधाधारकांसाठी सिलिंडरवर अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली. यावेळी केंद्रीय पर्यटनराज्यमंत्री श्रीपाद नाईक, नागरी पुरवठामंत्री रवी नाईक, खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर, आदी उपस्थित होते.
नागरी पुरवठा खात्याचे काम उत्तम
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अन्न पुरवठा खात्याचे कार्य हे खासकरून गरीब लोकांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या खात्यातर्फे नवनवीन बदल करण्यात आले आहेत. रवी नाईक यांच्या ऊपाने खात्याचे मंत्री हे अनुभवी व प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने खात्याचे कार्य उत्तमप्रकारे पार पडत आहे. सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ हा 11 हजार 500 लाभार्थ्यांना होणार असल्याने त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा, असेही ते म्हणाले.
केंद्रातील योजनांचा गोव्याला लाभ
केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या नऊ वर्षांत देशातील गरीब जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. कोणताही दुजाभाव न करता राबविलेल्या योजनांमुळे आज देशातील जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ गोव्यातील जनतेलाही होत असल्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
भाजप सरकार गरीबांसाठी झटणारे
नागरी पुरवठामंत्री रवी नाईक म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सरकारची कामगिरी भरीव चाललेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीमुळेच नागरी पुरवठा खात्यामार्फत शिधाधारकांसाठी प्रतिमहिना 35 किलो तांदूळ मोफत स्वऊपात दिला जात आहे. आता सिलिंडरचे अनुदानही देण्यात येणार असल्याने गरीबांना त्याचा फायदा होणार आहे. भाजप सरकार हे गरीबांसाठी झटणारे असल्याचे ते म्हणाले.
सर्व योजनांचे पैसे चतुर्थीपूर्वी देणार
काही तांत्रिक कारणामुळे काही योजना प्रलंबित राहिल्या आहेत. या प्रलंबित योजनांचे आर्थिक सहाय्य येत्या 15 सप्टेंबरपूर्वी लाभार्थ्यांना दिले जाईल. चतुर्थी काळात कुणालाच आर्थिक अडचण भासू नये, यासाठी सरकार दक्ष आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.









