कोल्हापूर :
कोल्हापूर खंडपीठ प्रश्नी मुख्य न्यायमुर्ती व मुख्यमंत्री यांची भेट होणे आवश्यक आहे. यासाठी कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी खंडपीठ कृती समितीच्या वतीने मंगळवारी (18 फेब्रुवारी) रोजी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅङ सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅङ खोत म्हणाले, मंगळवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूर जिह्यासह 6 जिह्यातील वकील कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात जमणार आहेत. यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांना निवेदन देवून रॅलीस प्रारंभ होणार आहे. यानंतर रॅली धैर्यप्रसाद हॉल, महाराणी ताराराणी पुतळा, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक येथे येणार आहे. यानंतर बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सीपीआर चौक, खानविलकर चौक मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे. यानंतर शिष्ठमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात येणार आहे. यानंतर रॅलीची सांगता होणार आहे. महारॅली दिवशी सकाळाच्या सत्रात बाररुम बंद राहणार आहेत. रॅलीवेळी मुंबई उच्च न्यायालयाचे परिक्रमा खंडपीठ स्थापन करावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी. कोल्हापूरात महसुल आयुक्तालयाची नियुक्ती करावी. झारखंडसह इतर राज्यांनी नवोदित वकीलांना सुरु केलेली शिष्यवृत्ती महाराष्ट्रात सुरु करावी अशा मागण्या करण्यात येणार आहेत.
यावेळी माजी अध्यक्ष अॅङ महादेवराव आडगुळे, माजी अध्यक्ष अॅङ अजित मोहिते, माजी सेक्रेटरी अॅङ संदीप चौगुले, स्मॅक सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबा कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, सचिव प्रसन्न तेरदाळकर, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशीरे, गोशिमाचे अध्यक्ष स्वरुप कदम, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, आयटीएफचे अध्यक्ष विनय खोबरे आदिंसह वकील उपस्थित होते.
- आंदोलनाची तीव्रता वाढविणार
खंडपीठ कृती समिती कोणाच्याही विरोधात आंदोलन करणार नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे केवळ त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची सुरवात करण्यात येणार आहे. सहा जिह्यातील वकीलांना विश्वासात घेवून टप्प्याटप्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅङ सर्जेराव खोत यांनी दिली.








