आज सूत्रे स्वीकारण्याची शक्यता : 21 जुलैपासून कारभार पीडीओ व सेक्रेटरीविना
बेळगाव : गैरकारभार करण्यासह कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या पीडीओ सुजाता बटकुर्की व सेक्रेटरी प्रताप मोहिते यांना निलंबित केले आहे. त्यांच्या जागी प्रभारी पीडीओ म्हणून कंग्राळी बुद्रुकचे गोविंद रंगाप्पगोळ यांची तर सेक्रेटरी म्हणून बेकिनकेरे ग्राम पंचायतीचे द्वितीय दर्जा सेक्रेटरी सत्याप्पा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभारी पीडीओ व सेक्रेटरी सोमवारी बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीत हजर होऊन सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जयश्री बी. शंकरानंद यांच्या मिळकतीची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
सदर प्रकरणात ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची तक्रार करण्यात आल्याने जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी चौकशी समितीची स्थापना केली. चौकशी समितीने बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या पीडीओ सुजाता बटकुर्की आणि सेक्रेटरी प्रताप मोहिते यांना दोषी ठरवत आपला अहवाल सादर केला. त्यामुळे सीईओ राहुल शिंदे यांनी दोघांवरही निलंबनाची कारवाई केली. 21 जुलै रोजी निलंबनाचा आदेश जारी झाल्यापासून बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीचा कारभार पीडीओ व सेक्रेटरी अभावी सुरू आहे. त्यामुळे लोकांची कामे खोळंबली आहेत.
कायमस्वरुपी पीडीओ, सेक्रेटरी द्या
प्रभारी पीडीओ म्हणून कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीचे गोविंद रंगाप्पगोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण, त्यांनी सदर पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, जिल्हा पंचायतचे सीईओ राहुल शिंदे यांनी त्यांना सूचना करत तातडीने बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीचे प्रभारी पीडीओपद स्वीकारण्यास सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी ते पंचायतीत हजर होण्याची शक्यता आहे. सेक्रेटरी प्रताप मोहिते यांच्या जागी बेकिनकेरे ग्रा. पं. द्वितीय दर्जा सेक्रेटरी सत्याप्पा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते देखील सोमवारी पंचायतीत हजर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी तातडीने कायमस्वरुपी पीडीओ, सेक्रेटरींची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.









