कर्जबाजारीपणामुळे बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार
बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्या सदस्या शिला काशिनाथ सांबरेकर (वय 37) या आपल्या पती आणि दोन मुलींसह बेपत्ता झाल्या आहेत. कर्जामुळे त्या सरस्वतीनगर, गणेशपूर येथील घर सोडून गेल्या आहेत. याप्रकरणी मंगळवार दि. 17 रोजी पॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. शिला यांच्यासह पती काशिनाथ निंगाप्पा सांबरेकर (वय 45), सानिका काशिनाथ सांबरेकर (वय 17) आणि प्राजक्ता काशिनाथ सांबरेकर (वय 15 सर्वजण रा. सरस्वतीनगर, गणेशपूर) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी काशिनाथ यांचा भाऊ सोमनाथ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सांबरेकर कुटुंबीयांनी अनेक जणांकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने याच कारणातून कोणालाही न सांगता त्या पती व दोन मुलींसह सोमवार दि. 16 रोजी घरातून बाहेर गेले आहेत. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होत नसल्याने अखेर सोमनाथ यांनी आपला भाऊ व त्याचे कुटुंबीय बेपत्ता झाल्याची फिर्याद पॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघेजण बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करून घेऊन त्यांचा शोध चालविला आहे. पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला अधिक तपास करीत आहेत.









