वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावरुन यू टर्न घेतला आहे. क्रिकेट वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून हा दिग्गज लवकरच वनडे क्रिकेटमधून रिटायरमेंटचा निर्णय मागे घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर ईसीबी व्यवस्थापकांशी झालेल्या चर्चेनंतर स्टोक्सने निर्णय फिरवत टीमला मोठा दिलासा दिला आहे. निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याने आता हा खेळाडू वर्ल्डकपमध्ये खेळणार असल्याचंही स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, बेन स्टोक्स न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून वनडेमध्ये पुनरागमन करणार आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 30 ऑगस्टपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. चार सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर उभय संघांमध्ये चार सामन्यांची वनडे मालिका 8 सप्टेंबर रोजी सुरू होईल. या वनडे मालिकेसाठी बेन स्टोक्सची इंग्लंड संघात निवड केली गेली आहे. स्टोक्सने मागील वर्षी वर्कलोडमुळे वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. पण आता आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. स्टोक्स फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट आहे, पण गोलंदाजीतही तो सक्षम आहे. त्यामुळे 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत त्याने इंग्लंडकडून खेळावे अशी आमची इच्छा आहे. संपूर्ण अॅशेस मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केली. मागील अनेक वर्षे तो सातत्याने हे काम करत आहेत. त्याने निवृत्तीचा मागे घेतलेला निर्णय हा आनंददायी आहे अशी प्रतिक्रिया इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.









