न्यूझीलंडचा 181 धावांनी पराभव, इंग्लंडची मालिकेत आघाडी
वृत्तसंस्था/लंडन
बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधील विक्रमी खेळी आणि संघाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे बुधवारी येथे खेळवण्यात आलेल्या चार सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 181 धावांनी दणदणीत पराभव करत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना बाकी आहे. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने 124 चेंडूत 9 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 182 धावांची खेळी करत सामनावीराचा बहुमान मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडचा डाव 48.1 षटकात 368 धावात आटोपला. त्यानंतर इंग्लंडच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 39 षटकात 187 धावात आटोपल्याने त्यांना हा सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला.
इंग्लंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडच्या बोल्टने सलामीच्या बेअरस्टोला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. त्यानंतर बोल्टने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना रुटचा 4 धावात त्रिफळा उडवला. बेन स्टोक्स आणि डेविड मलान यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेताना तिसऱ्या गड्यासाठी 199 धावांची भागीदारी केली. पहिल्या 10 षटकात इंग्लंडने 2 बाद 55 धावापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडने 16.2 षटकात आपले शतक पूर्ण केले. मलानने वनडे क्रिकेटमधील आपले पाचवे अर्धशतक 52 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने झळकवले. फलंदाजीत सातत्याने फॉर्म राखणाऱ्या स्टोक्सने आपले अर्धशतक 44 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने झळकवले. मलान आणि स्टोक्स यांनी शतकी भागीदारी 91 चेंडूत नेंदवली. स्टोक्सने यानंतर क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून फटके मारण्यावर अधिक भर दिला. त्याने चौकाराऐवजी षटकार खेचणे अधिक पसंत केले. या जोडीने दीडशतकी भागीदारी 119 चेंडूत पूर्ण केली. इंग्लंडचे द्विशतक 27 षटकात फलकावर लागले. स्टोक्सने वनडे क्रिकेटमधील चौथे शतक 76 चेंडूत झळकवताना 3 षटकार आणि 11 चौकार ठोकले. 31 व्या षटकात इंग्लंडची ही जोडी फोडण्यात न्यूझीलंडला यश मिळाले. बोल्टने आपल्या गोलंदाजीच्या दुसऱ्या सत्रात मलानला लॅथमकरवी झेलबाद केले. मलानचे वनडेतील पाचवे शतक केवळ 4 धावांनी हुकले. त्याने 95 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 96 धावा जमवल्या.
मलान बाद झाल्यानंतर कर्णधार बटलरने स्टोक्सला फलंदाजीची अधिक संधी दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 78 धावांची भागीदारी नोंदवली. फिलिप्सने बटलरला झेलबाद केले. त्याने 24 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 26 धावा जमवल्या. इंग्लंडच्या 250 धावा 202 चेंडूत तर 300 धावा 238 चेंडूत फलकावर लागल्या. स्टोक्सने यानंतर आपले दीडशतक 106 चेंडूत झळवताना 5 षटकार आणि 15 चौकारांची नोंद केली. शेवटच्या पॉवर प्ले दरम्यान इंग्लंडने 61 धावा जमवताना 6 गडी गमवले. इंग्लंडच्या 350 धावा 269 चेंडूत नोंदवल्या गेल्या. लिव्हिंगस्टोनने 11, मोईन अलीने 2 चौकारांसह 12, सॅम करनने 3, वोक्सने 3, अॅटकिनसनने 2 धावा केल्या. स्टोक्स डावातील 45 व्या षटकात बाद झाला. लिस्टरने त्याला यंगकरवी झेलबाद केले. इंग्लंडच्या डावामध्ये 11 षटकार आणि 36 चौकार नोंदवले गेले. न्यूझीलंडतर्फे बोल्ट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 51 धावात 5 तर लिस्टरने 69 धावात 3 तसेच फर्ग्युसन व फिलिप्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचे वेगवान त्रिकुट वोक्स, टॉप्ले आणि सॅम करन यांच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडची वरची फळी झटपट बाद झाली. न्यूझीलंडच्या डावामध्ये ग्लेन फिलिप्सने एकाकी लढत देत 76 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 72 धावा जमवल्या. रचिन रविंद्रने 22 चेंडूत 5 चौकारांसह 28, मिचेलने 31 चेंडूत 1 चौकारांसह 17, यंगने 13 चेंडूत 2 चौकारांसह 12, जेमिसनने 25 चेंडूत 14 धावा जमवल्या. पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात न्यूझीलंडने 36 धावात जमवताना 3 गडी गमवले. न्यूझीलंडचे पहिले अर्धशतक 76 चेंडूत फलकावर लागले तर शतक 134 चेंडूत नोंदवले गेले. इंग्लंडकडून दर्जेदार गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडले. या सामन्यात इंग्लंडने आपल्या अष्टपैलू आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर हा सामना मोठ्या फरकाने जिंकून मालिकेत आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडच्या डावामध्ये 2 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे वोक्स आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 3 तर टॉप्लेने 2 तसेच करन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
बेन स्टोक्सच्या 3000 धावा
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमध्ये आपला 3000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारच्या तिसऱ्या सामन्यात खेळताना त्याने विक्रमी आणि तुफानी 182 धावांची खेळी केली. त्याने 124 चेंडूत 9 षटकार आणि 15 चौकारांचा वर्षाव केला. त्याने 146 स्ट्राईक रेट राखला होता. या कामगिरीमुळे स्टोक्सने आता इंग्लंडतर्फे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा जमवणाऱ्या जेसन रॉयला मागे टाकले आहे. रॉयने 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 180 धावांची खेळी केली होती. स्टोक्सने 108 वनडे सामन्यात 40.50 धावांच्या सरासरीने 3159 धावा जमवल्या असून त्यामध्ये 4 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. 182 ही स्टोक्सची सर्वोच्च धावसंख्या आहे.
ट्रेंट बोल्टचा नवा विक्रम
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने बुधवारच्या तिसऱ्या सामन्यात 51 धावात 5 गडी बाद केले. बोल्टने वनडे क्रिकेटमध्ये एका डावात पाच गडी करण्याची ही सहावी खेप आहे. न्यूझीलंडतर्फे बोल्टचा हा विक्रम असून त्याने यापूर्वी न्यूझीलंडचा अष्टपैलू रिचर्ड हॅडली यांनी नोंदवलेला विक्रम मोडीत काढला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर बोल्टची गोलंदाजी अधिकच सुधारल्याचे जाणवते. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याने 8 गडी बाद केले आहेत.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 48.1 षटकात सर्वबाद 368 (मलान 96, रुट 4, स्टोक्स 182, बटलर 38, लिव्हिंगस्टोन 11, मोईन अली 12, बेअरस्टो 0, अवांतर 17, बोल्ट 5-51, लिस्टर 3-69, फर्ग्युसन 1-80, फिलिप्स 1-57), न्यूझीलंड 39 षटकात सर्वबाद 187 (कॉन्वे 9, यंग 12, निकोल्स 4, मिचेल 17, लॅथम 3, फिलिप्स 72, आर. रविंद्र 28, जेमिसन 14, फर्ग्युसन नाबाद 5, बोल्ट 2, लिस्टर 4, अवांतर 17, वोक्स 3-31, लिव्हिंगस्टोन 3-16, टॉप्ले 2-31, सॅम करन 1-32, मोईन अली 1-43).









