वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा सलामीचा फलंदाज बेन डकेट पाकिस्तानमध्ये 19 फेब्रुवारीपासून होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने दिली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी डकेट पूर्णपणे फिट असल्याने इंग्लंड संघासमोरील समस्या दूर झाली आहे.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना डकेटला स्नायु दुखापतीचा त्रास झाला होता. इंग्लंडचा क्रिकेट संघ मंगळवार 18 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये दाखल होणार आहे. त्यांचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 22 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाबरोबर लाहोरमध्ये होणार आहे. इंग्लंडचा ब गटात समावेश असून या गटात ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, अफगाण यांचा सहभाग आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश आहे.









